बनावट मेल आयडीच्या माध्यमातून १८ लाखांना गंडा; आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

नाशिक : मालक असल्याचे भासवून कंपनीच्या ईमेल आयडीचा ताळमेळ साधत सायबर भामट्याने बनावट ईमेल तयार करून एका नामांकित कारखान्याच्या बँक खात्यातून तब्बल १८ लाख ७९ हजार ७०० रुपये ऑनलाइन लांबविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

सायबर पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार ४ ते ५ फेब्रुवारीदरम्यान फोन आणि ईमेल आयडीच्या मदतीने सायबर चोरट्यांनी बँक आणि स्टर्लिंग मोटर्स या कारखान्याची फसवणूक केली. स्टर्लिंग मोटर्स या अस्थापनेचे युनियन बँकेत खाते असून, नेहमीच मोठे आर्थिक व्यवहार होत असतात. बँकेच्या प्राधान्य ग्राहकात स्टर्लिंग मोटर्स आणि त्याचे मालक फिरोज मिस्त्री येत असल्याने फोन अथवा ईमेलच्या माध्यमातून बँक आर्थिक व्यवहार पूर्ण करते. याचाच फायदा सायबर चोरट्यांनी घेतला.

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

नेमके काय घडले?

४ फेब्रुवारीला मिस्त्री यांच्या नावे बँकेत फोन कॉल करण्यात आला. लगेच पेमेंट करायचे असल्याचे सांगण्यात आले. यानंतर स्टर्लिंग मोटर्स कंपनीच्या अधिकृत ईमेलप्रमाणेच बनावट ईमेल तयार करून त्यावर अधिकृत दिसणाऱ्या लेटरहेडचा वापर करीत मिस्त्री यांच्या खात्यातून रक्कम काढून घेण्यात आली. या व्यवहाराची माहिती मिस्त्री यांना मिळताच त्यांनी बँकेशी संपर्क साधला. बँकेने फोन कॉल्स आणि ईमेलची माहिती घेतली असता हा बनावट प्रकार समोर आला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक देवराज बोरसे तपास करीत आहेत.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी