पुढारी ऑनलाइन डेस्क ; शिवसेना ठाकरे गटाचे उप नेते बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्यांनी आज गुरुवारी सकाळी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. (Baban Gholap Resign)
दरम्यान काल (दि. 14) नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांचा दौरा होता. नाशिकरोड येथे आदित्य ठाकरे यांची जाहिर सभा झाली. या सभेला बबनराव घोलप उपस्थित नव्हते. घोलप हे लवकरच ठाकरेंचे शिवबंधन सोडून शिंदे गटाच्या पालखीचे भोई होणार आहेत अशी चर्चा यावेळी झाली. आदित्य ठाकरे यांची पाठ फिरताच आज (दि.15) घोलप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याआधी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. (Baban Gholap Resign)
गेल्या चार दशकांपासून शिवसेनेसोबत असलेल्या घोलप यांनी पक्षफुटीनंतर ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्याआधीपासून त्यांना अनुसूचित जाती (एससी)साठी राखीव शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. स्वाभाविकच त्यांनी तशी तयारी चालवली होती. तथापि, शिर्डीचेच माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा रंगल्याने घोलप यांच्यामधील अस्वस्थता वाढली. आपली नाराजी त्यांनी थेट मातोश्रीवरदेखील बोलून दाखवल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याची दखल न घेता उलट नाशिकमध्ये वेळोवेळी झालेल्या प्रमुख बैठकांमध्ये त्यांना सामावून घेण्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. (Baban Gholap Resign)
शिवसेना विस्तारण्यात महत्त्वाचा वाटा…
शिवसेना उपनेते, मनोहर जोशी मंत्रिमंडळात समाजकल्याण मंत्री आणि पाच वेळा देवळाली मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांचा एकत्रित शिवसेना विस्तारित करण्यात महत्त्वाचा वाटा राहिला आहे. प्रशांत हिरे, उत्तमराव ढिकले, माणिकराव कोकाटे आदी मूळ काँग्रेस संस्कृतीतील बड्या नेत्यांना शिवसेनेत आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. तथापि, गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्हा शिवसेनेतील गट-तटाच्या राजकारणात त्यांचे नेतृत्व दुर्लक्षित झाले. काही महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये त्यांना डावलण्यात आले. याचा परिणाम त्यांनी स्वत:हून पक्षीय बैठकांना येणे टाळण्याचे धोरण स्वीकारले. ही परिस्थिती लक्षात घेता त्यांनी ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटावयास नको, अशी भावना त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसत आहेत.
तर त्यांचे स्वागतच
दरम्यान, यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता घोलप यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागतच आहे, अशी सूचक प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Mobile Selfie : अटल सेतूवर सेल्फीचा मोह आवरेना!, 11 लाखांचा दंड वसूल
- ‘जलजीवन’च्या 43 कोटींच्या योजनेची बरबादी
- Ashwini Bagal : ‘रावरंभा’ फेम अश्विनी बागल-अक्षय सेठीचे ‘तुमसे मिलु अपनी कहूं’ गाणं रिलीज
The post बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, कुणासोबत जाणार? appeared first on पुढारी.