बरंच काही राहून गेलंय अन् ते मिळवणार : पंकजा मुंडे

पंकजा मुंढे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राजकारणाची जबाबदारी आल्यानंतर अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत. पदव्युत्तर पदवीसाठी मला परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा होती. मात्र, ती राहून गेली. पण आता ते सारं मिळवावं, असं वाटत असल्याची इच्छा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. वुई प्रोफेशनलतर्फे आयोजित विद्यार्थी परिषदेत विलास बडे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्या बोलत होत्या.

असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल या संघटनेतर्फे रविवारी (दि. 8) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात त्यांच्या हस्ते युवकांना राज्यस्तरीय वंजारी युवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुधाकर आव्हाड होते. यावेळी आ. नरेंद्र दराडे, क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, अ‍ॅड. के. के. घुगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, युवा नेते उदय सांगळे उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणात काही मिळवण्यासाठी कुणापुढेही झुकणार नाही. स्वाभिमानाने जगणे हे आमच्या रक्तात आहे. राजकारणातही अनेक गोष्टी अजूनही करायच्या बाकी आहेत. त्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहणार आहे. ज्या गोष्टी सार्वजनिकरीत्या बोलता येत नाहीत, त्या लिहून ठेवते. माझ्या जीवनात आजवर आलेल्या अनुभवांवर आधारित पुस्तक लिहिणार आहे, असेही त्यांनी सांगितले. अ‍ॅड. सुधाकर आव्हाड म्हणाले, असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल ही माणसे घडवण्याचे काम करत आहे. ज्यांना पुरस्कार मिळाला, ती त्यांच्या कार्याची पावती आहे. प्रमुख अतिथींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट वकील म्हणून अ‍ॅड. अरविंद आव्हाड, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. विजय घुगे, औद्योगिक क्षेत्रातील पुरस्कार भरत गिते यांना देण्यात आला. तसेच कृषी उद्योगामधील सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा सत्यजित व अजिंक्य हंगे यांना प्रदान करण्यात आला. श्रावणी सांगळे (क्रीडा), विलास बढे (पत्रकार), राहुल कराड (शैक्षणिक), आश्लेषा शेळके (विद्यार्थी) प्रकारात पुरस्कारांचे वितरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. विलास बढे यांनी पंकजा मुंडे यांची प्रकट मुलाखत घेतली. हेमंत धात्रक, उदय सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनलचे अध्यक्ष उदय घुगे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत आव्हाड, नीलेश ढाकणे, अविनाश आव्हाड, वैभव आव्हाड, अशोक कुटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post बरंच काही राहून गेलंय अन् ते मिळवणार : पंकजा मुंडे appeared first on पुढारी.