बर्ल्ड फ्ल्यूमुळे उत्पादकांना १८० कोटींचा फटका! ग्राहकांच्या पसंतीमुळे भाव सत्तरीवर

नाशिक : बर्ल्ड फ्ल्यूचा उद्रेक मावळत निघाला असताना कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव वाढला, तशी चिकनला ग्राहकांकडून पसंती मिळू लागली आहे. त्याचा चांगला परिणाम म्हणजे, ब्रॉयलर कोंबड्यांचा किलोचा भाव ५५ ते ५७ रुपयांवरुन वाढत ६० आणि ६५ रुपयांपर्यंत पोचला. आज कोंबड्या ७० रुपये किलो भावाने विकल्या गेल्या आहेत. 

उत्पादक शेतकऱ्यांना १८० कोटी रुपयांचा फटका

राज्यातील बर्ल्ड फ्ल्यूमध्ये ब्रॉयलर कोंबड्यांच्या चिकनची मागणी मंदावली. राज्यात याकाळात महिन्याला चार कोटी याप्रमाणे दोन महिने ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादन घेण्यात आले. जानेवारीमध्ये किलोला सरासरी ५७, तर गेल्या महिन्यात ५५ रुपये किलो असा भाव मिळाला. त्याचवेळी दुसरीकडे कोंबड्यांचा किलोचा उत्पादन खर्च ६५ रुपये राहिला. बाजारात मिळालेला भाव आणि उत्पादन खर्च याचा विचार करता, जानेवारीमध्ये ८० आणि गेल्या महिन्यात १०० असा दोन महिन्यात राज्यातील ५० हजार उत्पादक शेतकऱ्यांना १८० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. सध्यस्थितीत साडेतीन कोटी कोंबड्यांचे राज्यात उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यात पिल्लं टाकणे शेतकऱ्यांनी टाळले. त्याचा परिणाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाणवेल. 

मार्च-एप्रिलमध्ये वजनात २० टक्के घट 

थंडीचे प्रमाण कमी होत असताना उन्हाचा चटका वाढू लागल्याने त्याचा विपरित परिणाम, ब्रॉयलर कोंबड्यांच्या उत्पादनावर होणार आहे. उनं वाढल्याने कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होईल. परिणामी, वजनात घट होईल. सर्वसाधारपणे १५ मार्चपासून एप्रिलमध्ये कोंबड्यांच्या वजनात १५ ते २० टक्क्यांनी घट येण्याची चिन्हे दिसताहेत. गेल्यावर्षी कोंबड्या ७० रुपये किलो भावाने विकल्या गेल्या होत्या. यंदा हाच भाव मिळेल अशी शक्यता दृष्टीक्षेपात आली आहे. हैदराबाद, बेंगळुरु, तमिळनाडूमध्ये ८०, तर गुजरात, राजस्थान, दिल्लीमध्ये ६८ रुपये किलो या भावाने ब्रॉयलर कोंबड्या विकल्या जात आहेत. 
हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..
खाद्याच्या भावात वाढ

ब्रॉयलर कोंबड्यांच्या खाद्याच्या भावात वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी क्विंटलभर मक्याचा भाव तेराशे रुपयांपर्यंत होता. तो आता दीड हजारावर पोचला आहे. याशिवाय सोयामीलचा क्विंटलचा भाव ३ हजार ८०० रुपयांवरुन साडेचार हजार रुपयांपर्यंत गेला आहे. खाद्याच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे कोंबड्यांचा किलोचा उत्पादन खर्च ६८ ते ७० रुपयांपर्यंत जाणार आहे. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

उन्हाळ्यात ब्रॉयलर कोंबड्यांच्या वजनात होणारी घट एकीकडे असताना दुसरीकडे मात्र कोंबड्यांच्या भावात वाढ होत चालली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास मार्च-एप्रिल महिना ‘पोल्ट्री इंडस्ट्री‘साठी चांगला राहील. दक्षिणेत सुद्धा कोंबड्यांचा भावात येत्या काही दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.