बळीराजा भारीच की..! घरच्या घरीच दर्जेदार कांदा रोपासाठी सुधारित पद्धत; नव्या पद्धतीचा अवलंब

खामखेडा (जि.नाशिक) : कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून उन्हाळ व पावसाळी दोन्ही हंगामातील कांदा लागवडीसाठी अजूनही प्राधान्याने पारंपरिक वाणाच्या बियाण्यांचा वापर होतो. हे बियाणे उत्पादक स्वतः शेतात तयार करतात. मात्र, या वर्षी महागडी कांदा रोपे खरेदी करावी लागल्याने सर्वच शेतकरी घरीच दर्जेदार कांदा रोपे तयार करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र कसमादे परिसरात आहे. 

खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांकडून नव्या पद्धतीचा अवलंब 
खरिपातील पोळ व रब्बीतील रांगडा, तसेच उन्हाळ कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात सर्वदूर घेतले जाते. मागील वर्षी राज्यात पावसाअभावी कांद्याचे क्षेत्र कमी झाल्याने चांगला भाव मिळाला. कांदा बियाणे तयार होण्याच्या टप्प्यात अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानामुळे बियाण्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली. चालू वर्षी सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांनी हाती असलेल्या बियाण्यांवर रोपे टाकली. मात्र, ऑक्‍टोबरमधील ढगाळ हवामान, धुके अन्‌ पाऊस यामुळे कांदा रोपांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांकडे घरची बियाणे नसल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर महागडी कांदा रोपे विकली गेली. पाच हजार रुपये किलो दराने देखील कांदा बियाणे विकले गेले. कांदा बियाण्यांची टंचाई व पावसामुळे रोपे खराब होण्याचे प्रमाण प्रचंड असल्याने कांदा बियाण्याला डिसेंबरपर्यंत मागणी असल्याने या वर्षी पायलीचा भाव तब्बल दहापटीने वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल
  
मल्चिंग पेपरवर कांदालागवड 
अनेक शेतकऱ्यांना रोपांसाठी पायलीला (सात किलो) ३५ ते ४० हजार रुपये मोजावे लागले. त्यामुळे चालू वर्षी पुढील हंगामात कांदा लागवडीसाठी महागडी बियाणे घेण्याएवजी अनेक शेतकरी हे बियाणे स्वतः तयार करतात. अनेक शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीने कांदा रोपांची लागवड केली आहे. अनेकांनी मल्चिंग पेपरवर कांदालागवड करत बियाणे तयार केली आहेत. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

बाजारातील महागडी बियाणे घेण्यापेक्षा घरीच कांदा बियाणे तयार करून दर्जेदार कांदा रोपे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. -गोकुळ मोरे, कांदा उत्पादक, खामखेडा