बहिणीच्या लग्नाचा बस्ता आटोपून परतताना भावाची दुर्दैवी एक्झिट! चारच दिवसांवर होते लग्न

सिन्नर (जि. नाशिक) : घरात अवघ्या चारच दिवसांवर आलेल्या  लग्नाची तयारी चाललेली, त्यातच बहिणीच्या लग्नाचा बस्ता आटोपून नववधुला सोबत घेऊन गावाकडं परतणाऱ्या भावासोबत घडेलेल्या दुर्दैवी प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मंगळवारी (ता. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास तालुक्यातील वावी येथे  वाल्मीक सोमनाथ लांडे (वय ३२, रा. रेंडाळे, ता. येवला) हा नात्याने बहीण असलेल्या वर्षा बाळासाहेब सुडके (वय २४) हिला सोबत घेऊन दुचाकीने (एमएच १५, डीडब्ल्यू ३७१०) जात होता. वर्षा हिचा २८ फेब्रुवारीला विवाह असल्याने तिचा बस्ता आटोपून दोघेही पाथरे गावाकडे परतत होते.

नेमके काय घडले?

पण वावी गावाजवळून हॉटेल पाहुणचारनजीक अपघाती वळणावर समोरून भरधाव येणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपरने (एमपी ३९, एच २९०७) दुचाकीस धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली सापडून दोघे बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले. पाठीमागून येणाऱ्या नातेवाईक व परिसरातील व्यावसायिकांनी दोघांना तातडीने सिन्नरला हलविले. मात्र, रस्त्यातच वाल्मीक यांचा मृत्यू झाला होता. तर वर्षावर तातडीची शस्रक्रिया करण्यात आली. अपघाताला कारणीभूत ठरणारा डंपर समृद्धी ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या मालकीचा असून, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, हवालदार प्रकाश गवळी, दशरथ मोरे यांनी धाव घेतली. डंपरच्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

उपाययोजना न केल्यास आंदोलन 

वावी परिसरात समृद्धी महामार्गासोबतच सिन्नर-शिर्डी महामार्गाचे काम सुरू आहे. या दोन्ही कामांवर साहित्य वाहून नेण्यासाठी ठेकेदारांच्या वाहनांची रात्रंदिवस वर्दळ असते. रस्त्यांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ही अवजड वाहने ये-जा करतात. संबंधित कंपन्या या वाहनांच्या वेगावर कुठल्याही प्रकारे नियंत्रण ठेवत नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात योग्य उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वावी सोसायटीचे अध्यक्ष विजय काटे यांच्यासह स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांनी दिला आहे. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले