बहिणीला अपशब्द बोलल्याचाच मनात राग; भावाने केला धक्कादायक प्रकार

घोटी (नाशिक) : धामणगाव परिसरातील घटना...संशयिताने बहिणीला शिवीगाळ केली म्हणून भावाने केला धक्कादायक प्रकार. राग इतका अनावर झाला की संशयिताचा तो दिवस ठरला शेवटचाच. घटनेने बघ्यांच्या अंगावर अक्षरश: काटाच. नेमके काय घडले?

अशी आहे घटना

एसएमबीटी धामणगाव (ता. इगतपुरी) येथील रोपवाटिकेत काम करणाऱ्या मजुरांमध्ये किरकोळ वाद होत. यात एका मजुराचा खून झाल्याची घटना गुरुवारी (ता. १४) घडली. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयितास तत्काळ पोलिसांनी गजाआड केले. 
एसएमबीटी येथे मजूर म्हणून काम करणाऱ्या संशयित निमसे विलासगिरी गोसावी (वय २६) याने बहीण उषाबाईस शिवीगाळ का केली म्हणून याच रोपवाटिकेत काम करणारे अशोक कचरू मोरे (४५, रा. भरवीर खुर्द) यास गुरुवारी रागाच्या भरात सुरवातीला लाथाबुक्यांनी व नंतर त्याचे डोके फरशीवर आपटले. यात मोरे गंभीर झाले व त्याचा मृत्यू झाला. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून कृत्य 

याबाबत घोटी पोलिसांत अनिता मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांना घटनेचे वृत्त समजताच पथकासह ते घटनास्थळी दाखल झाले. संशयितास तत्काळ ताब्यात घेतले. संशयिताने बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. पथकात सहाय्यक उपनिरीक्षक अनिल धुमसे, हवालदार भास्कर महाले, शीतलकुमार गायकवाड, केशव बस्ते, संदीप मथुरे यांचा समावेश होता.  

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?