बांगलादेशातील कर्करोग रुग्‍णांवर नाशिकमध्ये उपचार! किफायतशीर आरोग्‍यसेवेमुळे रुग्णांना दिलासा

नाशिक : मेडिकल टुरिझममध्ये नाशिक जगाच्‍या नकाशा‍वर पोचले असताना एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचे यात योगदान राहिले आहे. नुकताच हॉस्‍पिटलला बांगलादेशचे डेप्‍युटी हायकमिशनर मोहम्‍मद लुतफर रेहमान यांनी भेट दिली. बांगलादेशमधील कर्करोगग्रस्‍तांनाही दर्जेदार सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी मेमध्ये शिबिर होणार आहे. आवश्‍यक रुग्णांवर नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर हॉस्‍पिटलमध्ये शस्‍त्रक्रिया, औषधोपचार केला जाईल, अशी माहिती एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचे एम.डी. व चीफ रोबोटिक ॲन्ड कॅन्‍सर सर्जन प्रा. डॉ. राज नगरकर यांनी दिली. 

डॉ. नगरकर म्‍हणाले, की बांगलादेशचे डेप्युटी हायकमिशनर मोहम्मद लुतफर रेहमान यांनी सदिच्छा भेटीत हॉस्पिटलची पाहणी केली. वैद्यकीय सुविधा बघून ते प्रभावित झाले. बांगलादेशमध्ये केवळ एकच कॅन्‍सर हॉस्‍पिटल आहे. वर्षभरात तेथील सुमारे दीड लाख रुग्‍ण भारतात उपचारासाठी येतात. यापैकी मुंबईला पंधरा हजारांहून अधिक रुग्‍ण येत असून, सुमारे तीन हजार रुग्‍ण कर्करोगावरील उपचारासाठी येतात. एचसीजी मानवता कॅन्‍सर हॉस्‍पिटलच्‍या माध्यमातून जागतिक स्‍तरावरील आरोग्‍यसेवा किफायतशीर खर्चात उपलब्‍ध होणार असल्‍याने बांगलादेशच्‍या रुग्‍णांना दिलासा मिळेल, असा विश्‍वास या भेटीदरम्‍यान रेहमान यांनी व्‍यक्‍त केला. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

बांगलादेशमध्ये एचसीजी मानता कॅन्‍सर हॉस्‍पिटलचे डॉक्‍टर जाऊन शिबिरांतून तपासणी करतील. यानंतर आवश्‍यक त्‍या रुग्‍णांना नाशिकमधील हॉस्‍पिटलमध्ये उपचार केले जातील. या रुग्‍णांना व्हिसा व अन्‍य प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले जाईल. रुग्णालयाचे सर्जन डॉ. सरशेंदू रॉय, डॉ. ललित बन्सवाल, डॉ. आदित्य आढाव, डॉ. राजेंद्र धोंडगे, हेमॅटोलॉजिस्ट आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण तज्‍ज्ञ डॉ. गिरीश बादरखे, केमोथेरपीतज्‍ज्ञ डॉ. श्रुती काटे, डॉ. शौनक वालमे, डॉ. मकरंद रणदिवे, रेडिएशनतज्ज्ञ डॉ. विजय पालवे, डॉ. प्रकाश पंडित, डॉ. रोशन पाटील, पीईटी सीटी स्कॅनतज्‍ज्ञ डॉ. चैतन्य बोर्डे आदी उपस्‍थित होते. 

परदेशातील शंभराहून अधिक रुग्‍णांवर उपचार 

डॉ. राज नगरकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली २०११-१२ मध्ये परदेशातील पहिल्‍या रुग्‍णावर उपचार केले होते. तेव्‍हापासून राज्‍य व देशातील रुग्‍णांप्रमाणेच परदेशातील रुग्‍णांवर हॉस्‍पिटलमध्ये उपचार केले आहेत. तीन वर्षांमध्ये रुग्‍णालयात परदेशातून आलेल्‍या शंभराहून अधिक रुग्‍णांवर उपचार केले आहेत. या संदर्भात डॉ. नगरकर म्‍हणाले, की आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये वेगळा विभाग कार्यरत आहे. रुग्णांना व्हिसा मिळण्यासाठी मदत केली जाते. रुग्णांना त्यांच्या जीवनशैलीप्रमाणे आहार उपलब्‍ध केला जातो. काही परकीय भाषांकरिता अनुवादक (ट्रान्‍सलेटर) उपलब्‍ध केले आहेत. नाशिकमधील चांगले वातावरण, तज्‍ज्ञ डॉक्‍टर, शस्‍त्रक्रियांतील अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, किफायतशीर खर्चात उपचार होत असल्‍याने परदेशातून उपचारार्थ येणाऱ्या रुग्‍णसंख्येत वाढ होते आहे. आत्तापर्यंत दुबई, मध्य आशिया, आफ्रिका, येमेन, ओमान, बांगलादेश आदी ठिकाणांहून रुग्‍णांनी उपचार घेतल्‍याचे सांगत ताश्‍कंदला लवकरच पुन्‍हा ओपीडी सेवा सुरू करणार असल्‍याचे नमूद केले. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी