बांधकामे बंद पडण्याच्या मार्गावर; बांधकाम साहित्यांची दुकाने बंद ठेवल्याचे पडसाद 

नाशिक : ‘मिशन ब्रेक दि चेन’अंतर्गत राज्य शासनाने अघोषित लॉकडाउन जाहीर करताना नियमात बांधकामे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी बांधकाम साहित्यांची दुकाने मात्र बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याने मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दीडशेहून अधिक वस्तू बांधकामासाठी वारंवार लागतात. वस्तूंचा साठा करणे शक्य नसल्याने आपोआप बांधकाम व्यवसायावर कुऱ्हाड कोसळताना दिसत आहे. 

गेल्य वर्षी सलग तीन महिन्यांच्या लॉकडाउनमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला होता. ऑगस्ट महिन्यात सुरक्षेची सर्व साधने वापरून व व्यावसायिकांच्या जबाबदारीवर बांधकामे सुरू करण्यास परवानगी दिली होती. परंतु मजूर गावाकडे गेल्याने व्यवसायाची गाडी रुळावर येण्यास कालावधी लागला. दिवाळीत रिअल इस्टेट व्यवसायाने चांगली उचल खाल्ली. डिसेंबर महिन्यात युनिफाइड डीसीपीआरची घोषणा झाल्याने मागील संकटांची मालिका विसरून व्यावसायिक जोमाने कामाला लागले. परंतु फेब्रुवारीत कोरोनाने उचल खाल्याने बांधकामांच्या साईटवर मजुरांची संख्या घटली. मार्चअखेरपर्यंत लॉकडाउनची शक्यता वर्तविली जात होती. परंतु ४ एप्रिलपासून राज्य शासनाने लॉकडाउनऐवजी ब्रेक दि चेन हा शब्दप्रयोग करून इंडस्ट्री, वाहतूक, मेडिकल व किराणा दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

अघोषित लॉकडाउनचा परिणाम 

बांधकामांना इंडस्ट्रीजचा दर्जा नसला तरी मोठ्या प्रमाणात रोजगार यातून मिळतो. बांधकामे बंद ठेवल्यास रोजंदारीवर काम करणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागणार असल्याची बाब लक्षात घेऊन बांधकामांच्या साइट्स सुरूच ठेवण्याच्या सूचना दिल्याने समाधान व्यक्त केले जात होते. परंतु दुसरीकडे बांधकामांसाठी लागणारे साहित्यांची दुकाने बंद असल्याने बांधकामे सुरू असूनही उपयोग नसल्याने अघोषित लॉकडाउनचा परिणाम या व्यवसायावर होत असल्याची बाब व्यावसायिकाकंडून निदर्शनास आणून दिली जात आहे. 

दीडशे वस्तूंचा रोजचा संबंध 

सिमेंट, स्टील, रेती, खडी या वस्तूंचा साठा करणे शक्य आहे. परंतु बायंडिंग वायर, पेव्हर ब्लॉक, खिळे, लाकूड, रंग, प्लंबिंग मटेरिअल्स, प्लायवूड किंवा हार्डवेअरशी संबंधित दुकाने बंद असल्याने त्याशिवाय कामे होऊ शकत नाही. रोजच्या बांधकामात दीडशेहून अधिक वस्तूंची आवश्‍यकता भासते. सर्व प्रकारची दुकाने बंद असल्याने त्याचा परिणाम बांधकामांच्या साइट्स बंद पडण्यावर दिसून येत आहे. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

 

‘ब्रेक दि चेन’अंतर्गत बांधकामांच्या साइट्स सुरू असल्या तरी बांधकामांसाठी लागणारे साहित्यांची दुकाने बंद असल्याने त्याचा परिणाम बांधकामे बंद पडण्यावर होताना दिसून येत आहे. त्या मुळे ठराविक वेळेच्या मर्यादेत बांधकाम साहित्यांची दुकाने सुरू ठेवणे आवश्‍यक आहे. 
-हेमंत गायकवाड, बांधकाम व्यावसायिक