नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रागंणात बांबूपासून उभारलेले इकोफ्रेंडली कृषी प्रशिक्षण सभागृह लक्षवेधी ठरत आहे. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सभागृहाचे छत, खिडक्या, दरवाजेदेखील बांबूपासूनच तयार केले आहेत. सध्याच्या परिस्थितीत ही संकल्पना वाढत्या शहरीकरणात उपयुक्त ठरू शकते.
आकर्षक उभारणी; दारे-खिडक्यांचीही रचना वेधतेय लक्ष
सभागृहासाठी वापरलेला बांबू विद्यापीठातील जंगलातून उपलब्ध झाला. बांबू ही जगातील सर्वांत वेगात वाढणारी वनस्पती असून, एका दिवसात ९० सेंटिमीटरपर्यंत वाढ होते. बांबूला सामाजिक, आर्थिक, तसेच सांस्कृतिक महत्त्व आहे. बांबू स्वस्त असून, लवचिक, उच्च तन्यता, वजनाने हलका, भूकंपरोधक, अक्षय तसेच हरित जैविक स्रोत आहे. बांबू तोडल्यानंतर चार ते पाच वर्षांत नवीन बांबू उपयोगासाठी तयार होतो. या गोष्टी हेरून बांधकामात लोखंडाला पर्याय म्हणून बांबूपासून सभागृह उभारण्याची संकल्पना कुलसचिव डॉ. भोंडे यांनी राबविली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, कृषी विज्ञान केंद्राचे प्रशिक्षण संयोजक डॉ. रावसाहेब पाटील, संदीप भागवत, प्रा. अनिल देशमुख, किरण हिरे, केशव कामडी यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले.
हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न
...असे आहे सभागृह
सभागृहाचा व्यास ३० फूट आणि २२ फूट उंचीचे घुमटाकार कृषी प्रशिक्षण सभागृहाचा उपयोग कृषी विज्ञान केंद्रांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी होतो. सभागृहासाठी वापरलेला बांबू हा महाराष्ट्रात आढळणाऱ्या मानवेल जातीचा आहे. सभागृहाच्या (पाया, कॉलम, भिंती, गोलाकार बीम, तसेच घुमट फ्लोरिंगकरिता) बांबूचा वापर केलेला आहे. भिंती आणि कॉलममध्ये बांबूच्या वापराने भूकंपासारख्या दुर्घटनेतसुद्धा ही वास्तू समर्थपणे उभी राहील. या वास्तूकरिता वापरलेल्या बांबूच्या विविध चाचण्या करून त्यानुसार रचनात्मक आराखडा तयार केला आहे.
हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा
बांबूवर योग्यरीत्या प्रक्रिया केल्यास ते लोखंडाला पर्याय ठरू शकते, हे सहउदाहरण या सभागृहाच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. बांबूपासून बांधकामासंदर्भातील तंत्र आणि गुणवत्ता (स्टँडर्ड) निश्चित झाल्यास वापर वाढण्यास मदत होईल. यासंदर्भात शासनाच्या पातळीवर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. तसेच नागरिकांनीही बांबूचा जास्तीत जास्त वापर वाढविला पाहिजे. -डॉ. दिनेश भोंडे, कुलसचिव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ