बागलाणच्या तालुक्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळीने झोडपले; पिकांचे नुकसान, शेतकरी हवालदिल

तळवाडे दिगर (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात शनिवार(ता.२०)पासून ते मंगळवार(ता.२३)पर्यंत वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट व पाऊस झाला. निसर्गाच्या या लहरीपणामुळे परिसरातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. 

हजारो क्विंटल उन्हाळी कांदा भिजला

मंगळवारी (ता. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास तळवाडे दिगर, किकवारी, केरसाने, दसाने परिसरात वादळी वारा, वीजांचा कडकडाट व जोरदार गारपीट झाल्याने कांदा, फळबाग, भाजीपाला, गहू, हरभरा पिकांचे पुन्हा प्रचंड नुकसान झाले आहे. केरसाने येथे जास्त प्रमाणात गारपीट झाली असून तिथे गराचा अक्षरशः खच साचला होता. परिसरातील जवळपास ९० टक्के कांदा पिकाची लागवड केली असून, काही ठिकाणी कांद्याचे पीक जोमात आहे. काही ठिकाणी काढणी सुरू आहे, तर काही ठिकाणी उपटून खांडणीच्या तयारीत शेतात पडलेला हजारो क्विंटल उन्हाळी कांदा भिजला. भाजीपाला, फळबागा उद्ध्वस्त झाल्या. गहू, हरभरा, पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बळिराजा आर्थिक संकटात सापडला आहे. गारपिटीची सर्वाधिक झळ कांदासह भाजीपाला पिकांना बसली आहे. या गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

गतवर्षी कोरोनामुळे भाजीपाला शेतात सडला व वर्षभराचे नियोजन कोलमडले यंदा ही कोरोनाची दुसरी लाट त्या आता चार महिने कष्ट करून कांदा पीक उभे केले. अवकाळी व गारपिट पाठ सोडत नाही. अशात शेतकऱ्यानी जगावे कसे हेच कळत नाही. 
- प्रवीण आहिरे, युवा कांदा उत्पादक शेतकरी, केरसाने 

हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी