बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात डोंगरदऱ्यांना वणव्याची धग! आग लावणाऱ्या हातांना रोखण्याची गरज 

तळवाडे दिगर (जि. नाशिक) : जैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील डोंगरदऱ्यांतून आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक जीवजंतू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट होऊ लागले आहेत. शेकडो एकर जंगल जळून खाक होत आहे. 

वनराईने नटलेले  डोंगर आता काळे ठिक्कर

उन्हाळा सुरू झाला की परिसरात वणवे दर वर्षी पेटू लागतात. गवत जाळल्याने पावसाळ्यात येणारे गवत चांगले येते, या समजुतीने असे प्रकार सर्रास घडतात. काही विकृत व्यक्ती आगी लावण्याचे काम करतात. एकदा आग लगली की शेकडो हेक्टर परिसरात ती पसरते. अनेकदा ही आग संपूर्ण जंगलातील डोंगरदऱ्यांत मार्गक्रमण करते. त्यामुळे वनकर्मचारी, अधिकाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा रात्रीच्या वेळी असा प्रकार केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवजंतू होरपळून मरण पावतात. बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील सर्वच डोंगरदऱ्यांत हे वणवे मोठ्या प्रमाणात पेटू लागले आहेत. एरवी हिरव्यागर्द वनराईने नटलेले डोंगर आता मात्र काळे ठिक्कर दिसू लागले आहेत. वाढत्या पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासनाने व्यापक स्वरूपात शतकोटी वृक्षलागवडीची योजना हाती घेतली. अनेक सामाजिक संस्था, गाव, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मोठा गाजावाजा करतात. ही योजना राबविण्यात येत असली तरी वणव्याच्या आगीत ही योजना जळून ठिक्कर पडत असून, निसर्गाचा दुर्मिळ ठेवाही नष्ट होत आहे.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

 जबाबदारी घेण्याची गरज

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील मोठ्या प्रमाणात डोंगर असून, बरेच आदिवासी गाव, वाड्या, वस्त्या डोंगरावर तसेच पायथ्याशी असल्यामुळे या वणव्याचा धोका काही वाड्या-वस्त्यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही विकृत माणसे रस्त्याने जाता-येताना डोंगरदऱ्यांतून गवताला आगी लावण्याचे काम करतात. कोणाचीही देखरेख नसल्याने अशा वृत्ती फोफावत आहेत. एकदा आग लागली की ती अनेक दिवस धुमसत राहते. त्यामुळे पशुपक्षी सैरावैरा धावायला लागतात. अनेक सूक्ष्म जीव होरपळून जातात. ही आग कोण लावत आहे, याची जबाबदारी कोणीच घेत नाही. त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. 

बागलाण तालुक्यात सध्या जंगले जाळण्याचे प्रमाण खूप वाढत आहे. काही वर्षांपूर्वीची ही प्रथा आजही फोफावते आहे. काही विकृत विचार यामागे कारणीभूत आहेत. त्यामुळे वनसंपदेचा व वन्यजीवांचा नायनाट होतो आहे. उज्ज्वल भविष्यासाठी वने टिकविणे काळाची गरज आहे. यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने पुढाकार घेऊन कठोर अंमलबजावणी करावी. 
-यशवंत धोंडगे, निसर्गप्रेमी युवक, किकवारी खुर्द 

हेही वाचा > कोरोनात मधुमेहींसाठी 'म्युकोरमायकोसिस' रोग ठरतोय 'यमराज'!...

बागलाण तालुक्यातील एकूण वनपरिक्षेत्र 
परिमंडळाचे नाव एकूण क्षेत्र (हेक्टरमध्ये) 
सटाणा ६८१२.७९८ 
डांगसौंदाणे ४२६०.१३९ 
केळझर ६४३८.०२७ 
वीरगाव ३७००.७३० 
ताहाराबाद २६५३७.२०२