बागलाणमध्ये रंगणार मातब्बर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा थरार 

नामपूर (नाशिक) : नव्या वर्षात १५ जानेवारीला तालुक्यातील अत्यंत्य संवेदनशील व मातब्बर ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत. ऐन हिवाळ्यात निवडणुकीचा फड तापणार असून, नव्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार आहे. तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पॅनलचे नेते, गावपुढारी यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने निवडणुका चुरशीच्या होतील, यात शंका नाही. 

यंदा निवडणुक तरुणाई केंद्रित

यंदा थेट सरपंचपदाची निवडणूक रद्द झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला असला तरी यंदाची निवडणूक तरुणाईभोवती केंद्रित होणार आहे. तसेच थेट सरपंच निवडणूक रद्द झाल्याने घोडेबाजाराच्या माध्यमातून एका पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदाची मेगाभरती यंदाही नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. सरपंचपद ग्रामविकासाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. 
राजकीय क्षेत्रात दबदबा असणाऱ्या तालुक्यातील नामपूर, लखमापूर, ब्राह्मणगाव, ताहाराबाद, उत्राणे, निताणे, कोटबेल, अंबासन, करंजाड, वाडीपिसोळ आदी मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यंदा होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासावर नजर टाकली असता, तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या असून, यंदाही चुरशीची परंपरा कायम राहील. तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाले. काही गावांमध्ये फेररचना करण्यात आल्याने अनेक इच्छुकांची पंचाइत झाली आहे. वॉर्ड फेररचनेत झालेला बदल, महिलांचे आरक्षण यांमुळे इच्छुक उमेदवारांना अन्य वॉर्डांमध्ये आपले नशीब अजमावे लागणार आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

वातावरण तापण्यास सुरवात

ग्रामविकासाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी इच्छुक तरुणांच्या स्पर्धेमुळे तालुक्यात यंदाची ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावनिहाय विजयी होणाऱ्या उमेदवारांचा पैनलप्रमुखांकडून शोध सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने तालुक्यातील गावपातळीवरील राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने एकापेक्षा अधिक वॉर्डमध्ये चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे बागलाणमध्ये आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार आहेत. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

तालुक्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती : 

नामपूर, नवी शेमळी, लाडूद, मोराणे सांडस, रामतीर, निताणे, दरेगाव, दऱ्हाणे, इंदिरानगर, अंबासन, खमताणे, कंधाणे, कोळीपाडा, दोधेश्वर, तरसाळी, ताहाराबाद, रावेर, कठगड, सारदे, उत्राणे, राजपूर पांडे, रातीर, बिजोटे, औंदाणेपाडा, कौतिकपाडा, ब्राह्मणगाव, बोढरी, बिलपुरी, श्रीपूरवडे, वडे खुर्द, टिंगरी, ठेंगोडा, कोटबेल, मळगाव भामेर, जुनी शेमळी, लखमापूर, देवळाणे, वाडीपिसोळ, जयपूर, एकलहरे, सोमपूर, कुपखेडा, इजमाणे, धांद्री, विंचुरे, पिंपळदर, नळकस यशवंतनगर, शेवरे, करंजाड, भुयाणे.