बागलाण परिसरात वादळासह गारपीट; कांद्यासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान

तळवाडे दिगर (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात रविवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातले. त्या मुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. तळवाडे दिगर, पठावे दिगर येथे गारांचा खच पडला होता.

वादळी पावसात कांद्यासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून बाजूला रस्त्यावर पडले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या गारपीट, अतिवेगवान सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटामुळे आदिवासी पश्चिम पट्ट्यातील आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. उपटून खांडणीच्या तयारीत शेतात पडलेला हजारो क्विंटल उन्हाळी कांदा भिजला. तर हजारो हेक्टरवरील द्राक्ष व डाळिंबबागा उद्‌ध्वस्त झाल्या. गहू, हरभरा, पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. गारपिटीची सर्वाधिक झळ कांदासह भाजीपाला पिकांना बसली आहे. या गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

वर्षभराचे कष्ट व लाखो रुपयांचे उत्पादन जमीनदोस्त

परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हातान्हात आपल्या लेकराबाळांसह कांद्यासाठी वर्षभर शेतात राब राब राबून निसर्गाच्या आजपर्यंतच्या अस्मानी, सुलतानी संकटांशी दोन हात करत आपले कांदा पीक पिकवले होते. मात्र, रविवारी झालेल्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले. अनेकांच्या घरात चूलदेखील पेटली नाही.

बागलाण तालुक्यात तळवाडे दिगर, पठावे दिगर येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्यासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने तत्काळ शिवार पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी.
- पंकज ठाकरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सटाणा

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा