बाजारसमिती निधीचा दुरुपयोग; सचिवासह ११ संचालकांकडून सव्वा कोटींची वसुली

नाशिक : नाशिक बाजार समितीच्या निधीचे झालेल्या नुकसानीचा अहवाल सुरगाणा येथील चौकशी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक माधव शिंदे यांनी जिल्हा उपनिबंधकांना सादर केला होता. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी, सोमवारी (ता. ५) बाजार समितीच्या सुमारे एक कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांचा निधीचे नुकसान झाले आहे.

सचिवासह ११ संचालकांकडून सव्वा कोटींची वसुली 

नुकसान झालेल्या निधीची जबाबदारी ११ संचालकांसह सचिवावर निश्चित केली असून, त्यांच्याकडून कलम ५७ (२) नुसार वसुलीचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणारी नाशिक बाजार समिती म्हणून ओळखली जाते. संचालक मंडळाने कोरोना काळात अन्न-धान्याचे केलेले वाटप आणि टोमॅटो मार्केटमधील भाडेवसुलीत झालेले बाजार समितीचे नुकसान लक्षात घेऊन चौकशी अधिकारी माधव शिंदे यांनी आपल्या अहवालात एक कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले असून, त्याला संचालक मंडळाला जबाबदार धरले आहे. हा निधी संचालकांकडून वसूल करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी उपनिबंधक फयाज मुलानी यांची नेमणूक केली आहे. 

 

सहाय्यक निबंधक माधव शिंदे यांनी चुकीचा अहवाल सादर केला आहे. याबाबत आम्ही पूर्वीच पणन संचालकांकडे अपील दाखल केले आहे. यावर ७ एप्रिलला सुनावणी आहे. त्या मुळे या चौकशीवरच आमचा संशय आहे. -देवीदास पिंगळे, सभापती, बाजार समिती, नाशिक