बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद सुरु; एक टक्का सेसप्रकरणी व्यापारी आक्रमक

म्हसरूळ (नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य व्यापाऱ्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या १ टक्का सेसप्रकरणी नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना आक्रमक झाली असून, पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डमध्ये येथील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद सुरू केला आहे. बाजार समितीने तत्काळ तोडगा काढावा, अन्यथा हा बंद असाच सुरू राहील, असा इशारा संघटनेचे दिला आहे. 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने १ डिसेंबरला शरदचंद्र पवार उपबाजार आवारात येणारी धान्य व्यापाऱ्यांची वाहने अडवून १ टक्का सेस वसुली सुरू केली. राज्यात कुठल्याही बाजार समितीमध्ये १ टक्का सेस घेतला जात नाही. राज्यातील अन्य बाजार समित्यांप्रमाणे सेस द्यायला आम्ही तयार आहोत, मात्र अर्धा ते एक टक्का नफ्याने व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी बाजार समितीला अतिरिक्त १ टक्का सेस का द्यायचा, असा व्यापाऱ्यांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे. सेस वसुलीसंदर्भात बाजार समिती व धान्य व्यापारी संघटनेने एकत्र येऊन तोडगा काढावा, असे पत्र जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी संघटनेला दिले होते. त्याअनुषंगाने संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. ९) बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांना पत्र दिले. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

आजपासून बेमुदत संप 

दिवसभरात तोडगा न काढल्यास गुरुवार (ता. १०)पासून बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, सचिव राकेश भंडारी, मनोज वडेरा, अशोक वैश्य, मनोज कासलीवाल, राजेश कटारिया, परेश बोधानी, विजय सहा, पंकज लोढा, व्यापारी, कामगार, हमाल, टेम्पोचालक, तसेच ट्रकचालक, कलीनर सहभागी झाले होते 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळल

नऊ दिवसांपासून राज्यभरासह मध्य प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील शेकडो ट्रक मालासह उभे आहेत. ट्रकचालक, क्लीनर यात भरडले जात आहेत. त्यामुळे तोडगा निघेपर्यंत या वाहनांना बाजार समितीत प्रवेश द्यावा. तोडगा न निघाल्यास गुरुवार (ता. ९)पासून सर्व व्यापारी कुटुंबीयांसह बंदमध्ये सहभागी होणार आहेत. 
-प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना