बाजार समिती सचिवांसह संचालकांकडून सव्वा कोटींच्या वसुलीचे आदेश 

नाशिक : दीनदुबळ्या आदिवासी समाज बांधवांच्या वाट्याला आलेले दाणे व मार्केट कमिटीचे गाळे खाणारे भ्रष्टाचारी सभापती, संचालक व सचिव यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगाचा रस्ता दाखवावा, अशी प्रतिक्रिया नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिली. 

सहकार क्षेत्रात एकच खळबळ

नाशिक बाजार समितीत संचालकपदावर कार्यरत असताना, बाजार समितीचे गाळे व धान्य वाटपात दुरुपयोग केल्याने एक कोटी १६ लाख ५७ हजार रुपये सभापती देवीदास पिंगळे, सचिव यांच्यासह १२ संचालकांकडून वसूल करण्याचा निकाल जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी सोमवारी (ता. ५) दिला. त्यावर प्रतिक्रिया देताना चुंभळे यांनी वरील विधान केले. थकबाकी वसुलीसाठी नाशिक तालुका उपनिबंधक फय्याज मुलाणी यांची नियुक्ती केल्याचे निकालपत्रात नमूद केले आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या या निकालामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

वसूली होणार..

विभागीय उपनिबंधक यांच्याकडील ६ जुलै २०२० च्या चौकशी अहवालानुसार नाशिक बाजार समितीच्या झालेल्या निधीच्या नुकसानीबाबत बाजार समितीच्या दप्तरावरून सविस्तर तपासणी घेऊन बाजार समितीच्या निधीच्या नुकसानीस कोण किती प्रमाणात जबाबदार आहे, त्याची जबाबदारी निश्चित करून तसा अहवाल या कार्यालयास सादर करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक माधव शिंदे (सुरगाणा) यांची नेमणूक केली होती. त्यांनी चौकशी अहवाल कार्यालयात सादर केला आहे. या चौकशी आदेशात नाशिक बाजार समितीच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचे चौकशीअंती सिद्ध झाल्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांनी १ कोटी १६ लाख ५७ हजार रकमेची जबाबदारी निश्चित करून तसे आदेश निर्गमित केले आहेत. जमीन महसुलाची वसुली ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीने ही वसुली सभापती व संचालक मंडळाकडून करावी, असेही खरे यांनी आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

सहाय्यक निबंधक माधव शिंदे यांनी चुकीचा अहवाल सादर केला आहे. याबाबत आम्ही पूर्वीच पणन संचालकांकडे अपील दाखल केले आहे. यावर ७ एप्रिलला सुनावणी आहे. त्यामुळे या चौकशीवरच आमचा संशय आहे. 
-देवीदास पिंगळे, सभापती, बाजार समिती, नाशिक