बापलेकीचा वाद विकोपाला; पोलीस फौजदार जखमी, लेकीवर गुन्हा दाखल 

नाशिक : बापलेकीच्या वादात फौजदार जखमी झाल्याची घटना शरणपूर रोडवरील स्नेहबंधन पार्कमधील पीएसआय वसाहतीत घडली. काय घडले नेमके?

बापलेकीचा वाद विकोपाला; पोलीस फौजदार जखमी

पोलिसांच्या माहितीनुसार मोहन काकडे मंगळवारी (ता. २) दुपारच्या सुमारास आपल्या घरी असताना त्यांची मुलगी आपल्या मैत्रिणीस घेऊन वडिलांच्या घरी आली होती. या वेळी पैशाच्या वादातून बापलेकीमध्ये वाद झाला. मुलीने घरखर्चासह महाविद्यालयीन खर्चापोटी दहा हजारांची मागणी केल्याने बापलेकीचा वाद विकोपाला गेला. या वेळी संतप्त मुलगी किचनमधील सुरी घेऊन आली, तर तिच्या मैत्रिणीने जवळच पडलेली किटली उचलून फौजदार असलेल्या मैत्रिणीच्या वडिलांच्या डोक्यात टाकली. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

उपनिरीक्षकाच्या मुलीसह तिच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल

या घटनेत मुलीच्या मैत्रिणीने उपनिरीक्षकाच्या डोक्यात किटली मारल्याने ते जखमी झाले असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात जखमी उपनिरीक्षकाच्या मुलीसह तिच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मोहन काकडे (रा. पीएसआय क्वार्टर, स्नेहबंधन पार्क) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा