“बाबांनो हात जोडतो, नियम पाळा” रस्त्यावर उतरलेल्या महापौरांचे आवाहन

नाशिक : शहरात कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होत असताना बाजारपेठेतील गर्दी कमी होत नसल्याने अखेरीस महापौर सतीश कुलकर्णी रस्त्यावर उतरले आहे. गर्दी असलेल्या ठिकाणी दुकानदार व नागरिकांना भेटून हात जोडून नियम पाळण्याची विनंती त्यांनी करताना पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याने गर्दी नियंत्रणात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

शहरात दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत असून मृतांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. महापालिका व खासगी कोविड सेंटर अपुरे पडत असून रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन व व्हेन्टीलेटर बेड मिळत नाही. त्या उपरही शहरातील बाजारपेठांमधील गर्दी कमी होत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी रस्त्यावर उतरून नागरिकांसह दुकानदारांना आवाहन करत आहे. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दुकानदारांची असून, गर्दीबाबत नियम न पाळल्यास दुकानदारांवर कार्यवाही करावी लागेल असा सज्जड दम दिला. शालीमार, शिवाजी रोड, मेन रोड,भद्रकाली मंदिर, तिवंदा चौक, रविवार कारंजा, भद्रकाली भाजी मार्केट, भद्रकाली टॅक्सी स्टॅन्ड, दुध बाजार, फुले मार्केट, सारडा सर्कल या मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी महापौरांनी फिरून दुकानदारांना हात जोडून नियम पाळण्याची विनंती केली. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

पोलिसांचा ढिसाळ कारभार 

बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी नागरिक व दुकानदारांची व पोलिसांचीदेखील असून बहुतेक ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस यंत्रणेचा ढिसाळ कारभार दिसून आल्याचा आरोप महापौर कुलकर्णी यांनी केला. रविवार कारंजा भागात पोलिस उपस्थित असतानाही कोणत्याही प्रकारचे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न झाले नाही. पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत असून कोरोना संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन, पोलिस व महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे काम केल्यास परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

गर्दीवर नियंत्रणाची जबाबदारी फक्त पालिका प्रशासन नसून नागरिक, दुकानदार व पोलिसांचीदेखील आहे. गर्दी नियंत्रित करताना पोलिसांचा ढिसाळपणा कारणीभुत असल्याचे दिसून येते. कोरोना महामारीचे संकट थोपविण्यासाठी महापालिकेला नागरिकांनी सहकार्य करावे. 
- सतीश कुलकर्णी, महापौर.