बायको-लेकरांना भेटण्याची इच्छा अपूर्णच; कुटुंबाच्या आधारालाच रस्त्यातच काळाने घेरले 

सटाणा (जि.नाशिक) : बाळासाहेब बाहेरगावाहून काम आटोपून रात्री आपल्या घराकडे परतत होता. यावेळेस त्याला आपल्या कुटुंबाला भेटण्याची ओढ लागली होती. घरी पत्नी आणि दोन लेकरं त्याची आतुरतेने वाट पाहत होते. पण क्षणार्धातच असं काही घडलं ज्याने संपूर्णच होत्याचं नव्हतं झालं. काय घडले नेमके?

बायको-मुलांना भेटण्याची इच्छा अपूर्णच

ही घटना बुधवारी (ता. २४) रात्री घडली. बाळासाहेब माळी बाहेरगावाहून काम आटोपून दुचाकी (एमएच ४१, एएक्स ५५५८)ने घराकडे परतत असताना मोरेनगर ग्रामपंचायत हद्दीतील सटाणा ते पिंपळदर रस्त्यावरील नंदनवन लॉन्सजवळ दुचाकीचे नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात माळीच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने रक्तस्राव होऊन तो जागीच ठार झाला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरूष गेल्याने साऱ्यांनाच धक्का बसला असून नातेवाईकांमध्ये शोकाचे वातावरण आहे.

कामानिमित्त बाहेर गेलेल्या युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू 

मोरेनगर ग्रामपंचायत हद्दीतील सटाणा ते पिंपळदर रस्त्यावरील अहिल्याबाई होळकरनगर येथील नंदनवन लॉन्ससमोर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात पिंपळदर (ता. बागलाण) येथील बाळासाहेब माळी (वय ३५) जागीच ठार झाला.