Site icon

बारावीची आजपासून लेखी परीक्षा, नाशिक विभागात इतके परीक्षार्थी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा संपल्या असून, मंगळवार (दि.२१) पासून लेखी परीक्षेला प्रारंभ होत आहे. नाशिक विभागातून १ लाख ६२ हजार ९५९ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये ९१ हजार ७४९ मुलांचा तर ७१ हजार २१२ मुलींचा समावेश आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हानिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शिक्षण मंडळाने ‘शाळा तेथे परीक्षा केंद्र’ ही पध्दत बंद केली आहे. तर प्रत्यक्ष पेपर सुरू झाल्यानंतर प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या वेळेतही १० मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. नाशिक विभागात १ हजार ७० कनिष्ठ महाविद्यालये असून, २५६ नियमित परीक्षा केंद्र आहेत. या केंद्रावर पुढील महिनाभर अर्थात २१ मार्चपर्यंत इयत्ता बारावीची लेखी परीक्षा सुरू राहणार आहे.

यंदा बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून १ लाख ६२ हजार ९५९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहे. त्यामध्ये कला शाखेच्या ५८ हजार १३, वाणिज्य शाखेच्या २१ हजार २६० आणि विज्ञान शाखेच्या ७८ हजार ९१४ तर एमसीव्हीएसीच्या ४ हजार ६९० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच तंत्रविज्ञान शाखेचे ८४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक ७४ हजार ९३२ तर नंदुरबार जिल्ह्यातून सर्वांत कमी १६ हजार ७४६ परीक्षार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत

दरम्यान, इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून सुमारे तीनशे कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्र संचालक व पर्यवेक्षकांचा समावेश आहे. या कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय विद्यार्थी- परीक्षा केंद्र

जिल्हा       विद्यार्थी           परीक्षा केंद्र

नाशिक      ७४,९३२                १०८

धुळे           २३,९११                 ४५

जळगाव     ४७,३७०                ७६

नंदुरबार    १६,७४८                  २७

एकूण – १,६२,९५९                  २५६

हेल्पलाइनद्वारे मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात काही अडचणी असल्यास विभागीय मंडळाच्या हेल्पलाइनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर तीन दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहे. नाशिक विभागासाठी २९५०४१०, २९४५२४१, २९४५२५१ हे दूरध्वनी क्रमांक असणार आहे. तर राज्य मंडळ स्तरावरही हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना ०२०-२५७०५२७१ व ०२०-७०५२७२ या क्रमांकवर संपर्क साधता येणार आहे.

हेही वाचा : 

The post बारावीची आजपासून लेखी परीक्षा, नाशिक विभागात इतके परीक्षार्थी appeared first on पुढारी.

Exit mobile version