बारावीच्या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरमध्ये जमावबंदी

बारावी परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांना मंगळवार (दि.२१)पासून सुरुवात होत असल्याने परिमंडळ एक अंतर्गत येणाऱ्या परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राच्या चारही बाजूने शंभर मीटर अंतरात जमावबंदी लागू करण्यात आली असून, यासंदर्भात सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी आदेश जाहीर केले आहेत.

इयत्ता बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाल्याने परीक्षा केंद्रात अनधिकृत व्यक्तींच्या वावराची शक्यता असते. त्यांच्यामार्फत गैरमार्गाने परीक्षार्थीं विद्यार्थ्यांना कॉपी किंवा इतर साहित्य पुरवण्याची शक्यता असते. या परीक्षा निष्पक्षपणे सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस सहायक आयुक्त डॉ. धुमाळ यांनी २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत परीक्षा केंद्राच्या चारही बाजूने अनधिकृत व्यक्तींसह वाहनांना प्रवेशास बंदी आहे. तसेच परीक्षा केंद्रालगत झेरॉक्स सेंटरसह टेलिफोन, एसटीडी व आयएसडी बूथ, फॅक्स, ध्वनिक्षेपक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परीक्षा केंद्रात फोन, पेजर, मोबाइल, कॅल्क्युलेटर, वायरलेस सेट, अग्निशस्त्रे व घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास भादंवि कलम १८८ अंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आदेशात देण्यात आला आहे.

या केंद्रांना लागू असेल आदेश

परिमंडळ एकमधील सरकारवाडा विभागांतर्गत असलेल्या भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सीबीएसजवळील वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील के. टी. एच. एम. कॉलेज, क्रांतिवीर व्ही. एन. नाईक आर्टस्, कॉमर्स ॲड सायन्स कॉलेज, गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एच. पी. टी. आर्ट्स ॲण्ड आर. वाय. के. सायन्स कॉलेज, बी. वाय. के. कॉलेज ऑफ कॉमर्स व भोसला मिलिटरी स्कूल येथे परीक्षा केंद्रे आहेत. त्याचप्रमाणे मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मातोश्री सावित्रीबाई फुले व गुरुवर्य मोतीराम शिंदे कॉमर्स ज्युनिअर कॉलेज तसेच सारडा सर्कल येथील युज नॅशनल हायस्कूल फॉर बॉइज ॲण्ड ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी हे आदेश लागू राहणार आहेत.

हेही वाचा : 

The post बारावीच्या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरमध्ये जमावबंदी appeared first on पुढारी.