बारावीच्‍या विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा! याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता बारावीकरिता सुधारित विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना निश्‍चित केली आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना ऐनवेळी विषय बदलावे लागत असून, सध्याच्‍या परिस्थितीत अध्ययनातही मर्यादा येणार आहेत. त्‍यामुळे योजनेस यंदाच्‍या वर्षापुरता स्‍थगिती देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्‍य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाने शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला आहे. या संदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता असून, त्‍यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

विषय, मूल्यमापन यावर लवकरच निर्णय

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही या संदर्भात निवेदन दिले आहे. निवेदनात म्‍हटले आहे, की बारावीकरिता सुधारित विषय योजना व सुधारित मूल्‍यमापन योजनेच्‍या अंमलबजावणीच्‍या प्रथम वर्षीच विद्यार्थ्यांना विषय निवड करताना व त्‍यानुसार राज्‍यमंडळाच्‍या परीक्षेची आवेदन पत्रे भरताना अडच‍णी निर्माण झाल्‍या आहेत. याबाबतीत निर्णय निर्गमित होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी अकरावीला आवडीनुसार प्रवेश घेताना प्रचलित पद्धती, उपलब्‍ध विषय निवडलेले होते. गत वर्षी अभ्यासलेले विषय आणि त्‍याबाबत असलेली आवडीनुसार विद्यार्थ्यांनी बारावीतही गत वर्षीचे विषय कायम ठेवले. या शैक्षणिक वर्षात शाळा व महाविद्यालये अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसून, ऐनवेळी विषय बदलून परीक्षा देणे विद्यार्थ्यांच्‍या हिताचे नाही. अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होऊन त्‍यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. 

शासन आदेशातील त्रुटी दूर केल्या जातील

काही विषय माहितीअभावी बंद झालेले विषय शिकत आहेत. आता त्‍या विद्यार्थ्यांना बोर्डाच्‍या परीक्षेचा फॉर्म भरताना तो विषय नसल्‍यामुळे अडचण निर्माण झाली आहे. त्‍यामुळे हा निर्णय तूर्त स्‍थगित करून यापूर्वी चालत आलेल्‍या प्रचलित पद्धतीनुसार बारावीच्‍या विद्यार्थ्यांना विषय निवड करण्यास व त्‍यानुसार मंडळाच्‍या परीक्षा आवेदनपत्रे स्वीकारण्याचा निर्णय घेण्याबाबत मागणी केली. शिक्षण आयुक्त सोळंकी, संचालक जगताप, राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले व एससीईआरटीचे गरड यांची भेट घेत महासंघ पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. याबाबत शासन आदेश निर्गमित केला जाईल, अशी खात्री अधिकाऱ्यांनी दिल्‍याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विषय निवडीसंबंधित काढलेल्या ८ ऑगस्ट २०१९ या शासन आदेशातील त्रुटी महासंघ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत दूर केल्या जातील, असेही सांगितले. 

हेही वाचा > देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

संच मान्‍यतेबाबत सकारात्‍मक भूमिका 

या वर्षी होत असलेल्या २०१९-२० च्या संचमान्यतेमुळे, तसेच संभाव्य २०२०-२१ च्या संचमान्यतेमुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त होण्याचे वास्तव आयुक्त व संचालक यांचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे २०१८-१९ प्रमाणे संचमान्यता या वर्षीदेखील गृहीत धरावी, असा आग्रह शिष्टमंडळाने धरला. त्याबाबत शासनाकडे सकारात्‍मक प्रस्‍ताव सादर करण्याचे आश्र्वासन शिक्षण आयुक्तांनी दिले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, प्रा. संतोष फाजगे, प्रा मुकुंद आंदळकर, प्रा. सुनील पूर्णपात्रे, प्रा. दीक्षित आदी पदाधिकारी उपस्‍थित होते.  

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?