बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून सुरवात होणार

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने मागविले आहेत. या प्रक्रियेला मंगळवार (ता. १५) पासून सुरवात होणार असून, पात्र विद्यार्थ्यांना ४ जानेवारीपर्यंत आवेदनपत्रे सादर करता येतील. 

सध्या इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेल्‍या नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी आवेदनपत्रे सादर करू शकतील. बोर्डातर्फे उपलब्‍ध करून दिलेल्‍या कालावधीत उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्‍यानंतर त्‍यांना कॉलेज लॉगइनमधून प्री-लीड उपलब्‍ध करून दिली जाणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्‍याची प्रत काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदपत्रात नमूद केलेली माहिती जनरल रजिस्‍टरच्‍या माहितीनुसार पडताळून अचूक असल्‍याची खात्री करायची आहे. त्‍याबाबत प्री-लीस्‍टवर विद्यार्थ्यांची स्‍वाक्षरी घ्यायची आहे व त्‍यानंतर ही प्री-लीस्‍ट चलनासोबत विभागीय मंडळात जमा करायची आहे. शाळा, महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्‍क भरल्‍याच्‍या चलनासह विद्यार्थ्यांच्‍या याद्या व प्री-लीस्‍ट जमा करण्याची मुदत २८ जानेवारी २०२१ पर्यंत आहे. 

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण

...अशा आहेत महत्त्वाच्‍या तारखा 

नियमित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमार्फत सरल डेटाबेसद्वारे ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे दाखल करण्यासाठी मंगळवार (ता. १५) पासून ४ जानेवारीपर्यंत मुदत असेल. पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ५ ते १८ जानेवारीदरम्‍यान सादर करता येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाउनलोड करून चलनाद्वारे बँकेत शुल्‍क भरण्यासाठी मंगळवार (ता. १५) ते २५ जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे. 

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

महाविद्यालय बंदमुळे अडचणी 

दरम्‍यान, नाशिक जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये ४ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्‍यामुळे सद्यःस्‍थितीत पूर्वीप्रमाणे ऑनलाइन स्‍वरूपात अध्ययनाची प्रक्रिया सुरू आहे. अशात इयत्ता बारावीला असलेल्‍या नियमित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन आवेदनपत्रे सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अडचणी उद्‍भवण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे शिक्षण विभागाने महाविद्यालयांशी समन्‍वय साधत यावर तोडगा काढण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त केली जात आहे.