बाराशे कोटींच्या कांद्याचा अवकाळीने केला ‘वांधा’! पाच कोटींच्या भाजीपाल्यावर फिरविले पाणी

नाशिक : अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाने बाराशे कोटींच्या लेट खरीप आणि उन्हाळ कांद्याचा ‘वांधा’ केला. कांद्यातून चांगले पैसे मिळाल्याने फळबागा तोडून कांद्याकडे वळालेल्या शेतकऱ्यांचे या नुकसानीने कंबरडे मोडले. त्याचबरोबर कृषिपंढरीतील भाजीपाल्याचे भाव कोसळलेले असताना शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याच्या पाच कोटींच्या उत्पन्नावर पावसाने पाणी फिरविले. आर्द्रता वाढलेली असताना पावसाच्या पाण्यामुळे ‘अर्ली’ उत्पादन घेणाऱ्या बागलाणसह फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या बागांमध्ये झालेल्या नुकसानीचे लोण चांदवड-सिन्नरच्या पट्ट्यात पोचले. 

पाच कोटींच्या भाजीपाल्यावर फिरविले पाणी
पावसाच्या जोडीला गार वारे वाहत असल्याने द्राक्षांचे मणी तडकण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदरच नोव्हेंबरपर्यंत छाटलेल्या बागांमध्ये घडकूज, गळ वाढली आहे. अशातच, चांदवड-सिन्नर पट्ट्यात छाटणीनंतर ९० ते ९५ दिवस झालेल्या आणि १५ ते १६ मिलिमीटर आकाराचे तयार झालेले मणी तडकण्याचे प्रमाण वाढले आहे.

चांदवड-सिन्नर पट्ट्यात द्राक्षे तडकण्याचे लोण ​

द्राक्षाचा हजार कोटींच्या पुढे आर्थिक फटका पोचला आहे. दुसरीकडे कृषी विभागाचा बागलाण तालुक्यातील १८ गावांमधील २११ शेतकऱ्यांच्या १७० हेक्टरवरील द्राक्षांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज तयार झाला आहे. हा जरी प्राथमिक अंदाज असला, तरीही कृषी विभाग नुकसानग्रस्त सर्वदूर द्राक्ष उत्पादकांच्या बांधावर नेमका कधी पोचणार आणि त्यातून नुकसानीची नेमकी स्थिती कधी पुढे येणार, हे प्रश्‍न अनुत्तरित आहेत. द्राक्षबागायतदार संघाचे कैलास भोसले यांनी द्राक्षांमधील नेमक्या नुकसानीची स्थिती ढगाळ हवामान संपून प्रत्यक्षात सूर्यनारायण दर्शन देईल, त्यानंतर दोन दिवसांनी स्पष्ट होईल, असे ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. 

कांदा उत्पादकांची व्यथा 
निमोण (ता. चांदवड) येथील संपत उगले यांनी लेट खरीप कांद्यावर मावा, करप्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांची फवारणी केली. तरीही रोगकीड आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसल्याने किती उत्पन्न मिळेल याबद्दलची चिंता त्यांना भेडसावू लागली आहे. रोगकिडीमुळे कांद्याचे पोषण होण्याचा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे. जिल्ह्यात २३ हजार हेक्टरवर खरीप कांद्याची लागवड झाली होती. त्यातील बराचसा कांदा शेतकऱ्यांनी विकला असून, २० टक्क्यांपर्यंत कांद्याची विक्री होणे बाकी आहे. तसेच, लेट खरिपाचे क्षेत्र ७७ हजार हेक्टर असून, अजूनही ८० टक्के कांद्याची काढणी बाकी आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्यामुळे कांद्यामध्ये सड आणि कूज वाढली आहे. हेक्टरी २० टनांपर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन अपेक्षित असताना ३० हजार हेक्टरला बसलेल्या फटक्यामुळे २७० कोटींपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर पाणी फिरले आहे, तसेच नोव्हेंबरमध्ये रब्बी उन्हाळ कांद्याची रोपे शेतकऱ्यांनी तयार केली आहेत. गेल्या वर्षी एक लाख ७१ हजार हेक्टरमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याचे उत्पादन ४० लाख टनांपर्यंत घेतले होते.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

एक हजार कोटींचा दणका शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय

यंदा १७ हजार हेक्टरवर कांद्याची रोपे तयार करण्यात आली आहेत. त्याची पुनर्लागवड होण्याची तयारी शेतकरी करत होते. या रोपांचे पावसाने नुकसान केलेले असताना मर, करपा, तुडतुडे अशा कीडरोगांनी रोपे ग्रासली आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार २५ टक्के रोपांचे नुकसान झाले आहे. हेक्टरी २५ हजार रुपयांप्रमाणे रोपांचे झालेले हे नुकसान दहा कोटींच्या पुढे गेले आहे. आता बियाणे उपलब्धतेचा प्रश्‍न तयार झाल्याने पुन्हा रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड करण्याची शक्यता मावळली असल्याने यंदा ४० हजार हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड होऊ शकणार नाही. उन्हाळ कांद्याचे हेक्टरी २५ टनांपर्यंत उत्पादन शेतकरी घेतात. कांद्याला सरासरी मिळणाऱ्या बाजारभावाचा विचार करता, उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात एक हजार कोटींचा दणका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

भाजीपाल्याच्या नुकसानीची स्थिती 
भाजीपाल्याचे जिल्हाभरात ५० हजार हेक्टरपर्यंतचे क्षेत्र आहे. त्यात टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, पालक याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. ढगाळ हवामानामुळे एकीकडे भाजीपाल्यावर रोगकिडीचा 
प्रादुर्भाव वाढलेला असताना दुसरीकडे भाजीपाल्याचे पावसाने नुकसान केले आहे. हे नुकसान आणि रोगकीड नियंत्रणासाठी कराव्या लागलेल्या फवारण्या याचा विचार करता, हेक्टरी शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचा अतिरिक्त दणका सहन करावा लागला आहे. पावसाने आणि रोगकिडीने केलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला बाजारात विकण्याची घाई सुरू केली असल्याने भाव कोसळले आहेत. अशा तिहेरी संकटात भाजीपाला उत्पादक गुरफटले आहेत.