लासलगाव (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा : मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याने ४७५१ रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडला. देशांतर्गत कांद्याची मागणी वाढल्याने कांदा भाव खाताना दिसत आहे. कांदा दराचा आलेख वाढत असताना निर्यात मात्र अगदी नगण्य सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्येही व्यापारी कांदा खरेदी बाबत धास्तावलेले आहे. केंद्र सरकारकडून केव्हाही कांद्याबाबत कठोर पावले उचलली जाऊ शकतात या कारणामुळे निर्यात मंदावलेली असल्याचे व्यापारी वर्गाकडून बोलले जात आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे. मात्र खराब हवामानामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याच्या प्रतवारी आणि गुणवत्तेत घट झाल्याने कुठेतरी पडतल बसत आहे. त्यामुळे केंद्राने कांदा भाव पाडण्यासाठी हस्तक्षेप करू नये अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. (दि १४) ऑक्टोबर रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला २८७० रुपये भाव मिळाला होता. मात्र गेल्या बारा दिवसांत आवक मंदावल्याने कांद्याच्या दरात ६५ टक्के ने वाढ होत ४७५१ रुपयांचा दर मिळाला आहे. (Onion Price)
या हंगामामध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे नवीन लाल कांद्याची आवक अद्यापही पूर्ण क्षमतेने बाजार समित्यांमध्ये येत नसल्याने तसेच उन्हाळ कांदाही कमी प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी होत आहे. तर मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उन्हाळा कांदा साठवून ठेवलेला होता मात्र वातावरणातील बदलामुळे या कांद्याच्या प्रतवारी मध्ये कमालीची घट झालेली आहे. त्यामुळे दर जरी वाढलेले दिसत असले तरी शेतकऱ्यांना खूप काही मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ज्यावेळेस मुबलक प्रमाणामध्ये कांदा चाळीमध्ये शिल्लक होता, त्यावेळेस कांद्याला भाव नव्हते आणि आता उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव आहे मात्र कांदा शिल्लक नसल्याचे वास्तव्य शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे. (Onion Price)
उन्हाळ कांदा संपत येत असताना नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरवात होते. प्रत्यक्षात मात्र नवीन लाल कांद्याची आवक वाढण्यासाठी आणखी महिन्याभराचा कालावधी अपेक्षित आहे. परिणामी, शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या उन्हाळ कांदा भाव खात आहे. आता देशांतर्गत आणि निर्यातीची सारी मदार नाशिकच्या कांद्यावर अवलंबून असल्याने कांद्याच्या भावात अशीच तेजी राहू शकते अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहे.
कांदा भाव आलेख (कमाल)प्रति क्विंटल
१४ ऑक्टोबर -२८७०
१७ ऑक्टोबर -३५५५
२० ऑक्टोबर -३६००
२३ ऑक्टोबर -४१४१
२५ ऑक्टोबर -४६४६
२६ ऑक्टोबर – ४७५१
हेही वाचा :
- जळगाव जिल्ह्यात 1203 नवदुर्गा मंडळाचे विसर्जन, पोलिसांची तारेवरची कसरत
- Breast Cancer Awareness : पुरुषांना स्तनांचा कॅन्सर होतो का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात?
- Laxmikant berde यांच्या मृत्यूनंतर धायमोकलून रडला होता सलमान खान
The post बारा दिवसांत कांदा दरात 65 टक्के वाढ, मात्र शेतकऱ्यांना फायदा नाहीच appeared first on पुढारी.