नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषद पुन्हा सतर्क झाली आहे. ज्या मंगल कार्यालयात असे बालविवाह होतील, त्या कार्यालयावर तसेच बालविवाह करण्यासाठी जे मध्यस्थ कार्यरत असतील त्यांच्यावरही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. याबाबत आदेश काढण्यात आला आहे. तसेच असे गैरप्रकार होत असल्यास १०९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेसंदर्भात जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या सूचनांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच वेळी जिल्ह्यातील ज्या भागांत बालविवाह जास्त प्रमाणात होतात त्या भागात कायदेविषयक कार्यशाळादेखील घेण्यात येणार आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत बालविवाह करू नये, बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाह होणार असल्याचे कळाल्यास तक्रार कुठे करावी याबद्दल जनजागृती करण्यात आली होती. त्याचाच परिणाम म्हणून जिल्हा प्रशासनाकडे बालविवाहांसंदर्भात गोपनीय तक्रारी प्राप्त झाल्या, त्या अनुषंगाने कारवाई करत महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यात 28 बालविवाह रोखले. यामध्ये नाशिक तालुक्यातील सिन्नर, बागलाण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या भागांत बालविवाह रोखण्यात आले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली 1 एप्रिलपासून जुलैच्या मध्यापर्यंत एकूण 28 बालविवाह रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आले असल्याची माहिती नाशिक जिल्हा बालविकास कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- राज्यभर दस्तनोंदणी ठप्प ! 500 दस्तनोंदणी कार्यालयांत सर्व्हर डाऊनचा परिणाम
- Irshalwadi landslide : इर्शाळवाडी दरड दुर्घटना : ७५ जणांना बाहेर काढण्यात यश : उपमुख्यमंत्री फडणवीस
- Irshalgad Landslide : रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली; ५ जणांचा मृत्यू, मदतकार्य युद्धपातळीवर
The post बालविवाहास प्रोत्साहन द्याल; तर जेलची हवा खाल appeared first on पुढारी.