बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण

पटसंख्या www.pudhari.news

नाशिक (सायखेडा) : अमित कदम

दारिद्र्यरेषेखालील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातीतील पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून प्रती विद्यार्थिनी एक रुपया प्रोत्साहन उपस्थिती भत्ता देण्यात येतो. मात्र गेल्या ३० वर्षांपासून या प्रोत्साहनपर भत्त्यात सरकारने एकाही पैशाची वाढ केलेली नसल्याने बालिकादिनी सावित्रींच्या लेकींची रुपयावर बोळवण केल्याचे निर्दशनास आले आहे.

महागाईच्या निर्देशांकानुसार विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यात नक्कीच वाढ व्हायला हवी. परंतु, वरिष्ठ पातळीवरूनच त्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. लोकप्रतिनिधींनी नियमित पाठपुरावा करणे गरजेचे आहे. – प्रदीप कुटे, केंद्रप्रमुख, सायखेडा

सावित्रीबाई फुले यांच्या नावे सुरू केलेल्या योजनेतील प्रोत्साहन भत्ता वाढविण्याचा प्रयत्न शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधीकडून होत नसल्याने विद्यार्थिनींचे नुकसान होत आहे. ‌जिल्हा परिषद शाळांतील उपस्थिती वाढविण्यासाठी १९९२ ला तत्कालीन सरकारने प्रतिविद्यार्थिनी एक रुपया प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ही योजना सुरू केली, परंतु ३० वर्षांनंतरही सावित्रीच्या लेकींची एका रुपयावरच बोळवण केली जात आहे. सद्यपरिस्थितीत महागाईने कळस गाठला असून, शैक्षणिक साहित्याच्या किमतीही मोठ्या वाढल्या आहेत. लेखणीसाठी असणा-या पेनमधील कांडीची किंमत एक रुपयापेक्षा जास्त आहे. तरीही आजतागायत कोणत्याच सरकारने विद्यार्थिनींच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला नाही. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू केलेल्या योजनेचे गेल्या वर्षीच रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. तेव्हादेखील भत्त्यात वाढ करण्याचे सत्ताधारी सरकार सपशेल विसरले. मुलींना आजही ३० वर्षांपूर्वीइतकाच प्रोत्साहन भत्ता देण्याचा प्रकार म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होत आहे. तसेच तो रुपयादेखील वेळेवर मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सरकारने आता सावित्रीच्या लेकींची थट्टा थांबवावी, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.

महागाईच्या जगात रुपयात काय येते याचा शासनाने विचार करावा. आर्थिक निकषावर प्रोत्साहन भत्त्यात वाढ गरजेचे आहे. किमान दहा रुपया तरी प्रतिदिन प्रोत्साहन भत्ता मिळावा. – बाजीराव कमानकर, अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ निफाड

गेल्या ३० वर्षांच्या काळात आमदार, खासदारांच्या भत्त्यात भरघोस वाढ झाली. त्यांना वेतन आयोगदेखील लागू झाला. मात्र, शैक्षणिक भत्त्यात वाढ झालेली नाही. शिक्षण विभाग एक रुपया देऊन आमची बोळवण करत आहे. – संदीप आढाव,पालक, भेंडाळी.

हेही वाचा:

The post बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण appeared first on पुढारी.