नाशिक : भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना असा पक्षीय प्रवास करणारे माजी आमदार बाळासाहेब सानप पुन्हा भाजपच्या वाटेवर असताना त्यांना तातडीने मातोश्रीवर बोलावणे आल्याने त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सानप यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यासाठी आतुर असलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यामुळे धक्का बसला आहे. सानप यांना जबाबदारी देण्याचा शब्द दिल्याचे बोलले जात आहे.
नेमके काय घडले
चार वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या माजी आमदार सानप यांच्या राजकीय कारकीर्दीला वर्षभरापासून घरघर लागली आहे. २०१७ मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर सानप यांनी सर्व सूत्रे स्वतःकडे ठेवली. महापौर नियुक्तीपासून ते महापालिकेसंदर्भात प्रत्येक निर्णय सानप यांना विचारात घेतला गेला. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांना मानले गेले. परंतु महापालिकेतील काही आर्थिक निर्णयांमुळे सानप व महाजन यांच्यात बिनसल्याने दुरावा वाढत गेला. त्याची परिणती सानप यांचे आमदारकीचे तिकीट कापण्यात झाले. ऐनवेळी ॲड. राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आल्याने सानप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अचानक सानप यांनी शिवबंधन हाती बांधले. सानप यांना शिवसेनेत प्रवेश देताना महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवले गेले. महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही त्या सत्तेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सानप समर्थक नगरसेवकांना हाताशी धरून झाले. हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर सर्वा वर्षांपासून ते अज्ञातवासात आहे. सानप यांच्यामुळे भाजपचे नुकसान झाल्याची खंत वरिष्ठ नेत्यांमध्ये असल्याने त्यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्याची तयारी झाली. प्रवेश जवळजवळ निश्चित झाला असताना जळगावमधील बीएचआर पतसंस्थेवरील कारवाईमुळे तूर्त प्रवेश थांबला.
हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...
शिवसेनेलाही सानप यांची गरज
सानप यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात महामंडळ किंवा विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. परंतु तसे न झाल्याने शिवसेनेत येऊन फसल्याची भावना झाल्याचे त्यांच्या निकटवर्तियांकडून बोलले जात आहे. तोच धागा पकडून दोन दिवसांपूर्वी सानप यांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आल्याचे समजते. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः सानप यांच्याशी संवाद साधून मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे. पंचवटी विभागात २४ पैकी शिवसेनेचा एकमेव नगरसेवक असल्याने या भागातून सानप यांच्या माध्यमातून अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी त्यांची गरज राहणार असल्याने शिवसेनाही सहजासहजी सानप यांना सोडणार नाही. सानप यांना थांबविण्यासाठी स्थानिक पातळीवरही प्रयत्न होत आहेत.
हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा