Site icon

बावनकुळेंनी स्वत:च्या डोळ्यातील मुसळ पहावे : अरविंद सावंत यांचा हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केवळ दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसत आहे. त्यांनी स्वतःच्या डोळ्यातील मुसळ पाहावे. छ्त्रपती शिवाजी महाराजांचा आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अवमान केलेले त्यांच्या लक्षात राहात नाही. त्यामुळे ते केवळ कुसळ शोधत असतात. आता त्यांना म्हणावं, जा तिकडे नतमस्तक व्हायला आणि बोला औरंगजेबजी मैं आया हूं…अशी सडकून टीका शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार अरविंद सावंत यांनी बावनकुळेंवर केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करताना औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला. त्यावरून विरोधी पक्षांनी बावनकुळे यांना कोंडीत पकडले असून, खासदार अरविंद सावंत यांनीही त्यांच्यावर नाशिकमध्ये सडकून टीका केली. ते म्हणाले की, भाजपचे लोक नेहमीच दुसऱ्याचे कुसळ शोधतात. परंतु, तेच त्यांच्यांवर बुमरँग होत आहे. संभाजीनगरला जाऊन त्यांना ‘औरंगजेबजी मैं आया हूं…’ असं काहीतरी बोलावे लागेल, असा टोला सावंतांनी लगावला. शिवसेनाप्रमुखांनी शिकवण दिली की सत्त्व आणि तत्त्व न सोडण्याची. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘लढाऊ होऊ नका, पण विकाऊ होऊ नका’, अशी शिकवण दिली आहे. मात्र इथे विकाऊ होणाऱ्या माणसांबद्दल काय बोलावे? असा प्रश्न करत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष बांधणीसाठी कंबर कसली असून, नाशिकमध्येच नाही, तर ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. ‘या लोकांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या वागणुकीविषयी जनतेच्या मनात प्रचंड चीड असल्याचे खासदार सावंत यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे यांनी युती जाहीर केली. जोगेंद्र कवाडे यांनी तळागळातून संघर्ष करणारे नेतृत्व महाराष्ट्राच्या प्रमुखपदी बसले असून, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आमच्या निवेदनाची साधी दखलही घेत नव्हते, अशी टीका केली. त्यावर सावंत म्हणाले, जोगेंद्र हे इंद्र आहे की नाही, ते आधी ठरवा, मग बघू काय ते..!

खासदार सावंतांना प्रवेश नाकारला
खासगी कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आलेल्या खासदार अरविंद सावंत यांना पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने शासकीय विश्रामगृहात प्रवेश नाकारण्यात आला. खासदार सावंत यांनी विश्रामगृहातील कक्षाची मागणी केली असता, आचारसंहितेमुळे कर्मचाऱ्यांनी त्यांना कक्ष नाकारला. त्यावर सावंतांनी कक्षाचा हट्ट धरला असता, कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. तिथे उपस्थित असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आचारसंहितेमुळे कक्ष देता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मात्र सावंत यांनी खासगी हॉटेलचा मार्ग धरला.

हेही वाचा :

The post बावनकुळेंनी स्वत:च्या डोळ्यातील मुसळ पहावे : अरविंद सावंत यांचा हल्ला appeared first on पुढारी.

Exit mobile version