बिटकोत जूनपासून वैद्यकीय महाविद्यालय; अंदाजपत्रकात शंभर कोटींची तरतूद

नाशिक : अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाशिक रोडच्या नवीन बिटको रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासकीय मान्यतेसह निधी व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आराखडा सादर करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या. १५ फेब्रुवारीपर्यंत शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार असून, अंदाजपत्रकात शंभर कोटींची तरतूद केली जाणार आहे. 

डॉक्टरांची उपलब्धता आवश्यक

नाशिक रोड येथील डॉ. जे. डी. बिटको रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी ससून रुग्णालयाच्या धर्तीवर रुग्णालयाला सक्षम करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची क्षमता नसल्याने महापालिकेच्या माध्यमातून वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न यापूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात सुरू झाले होते. महापालिका आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार होते. यासाठी महासभेची मंजुरीदेखील मिळाली होती. परंतु, करारनाम्यावरून हा सर्व विषय फिसकटला. महापालिकेचा प्रकल्प पिंपरी चिंचवड महापालिकेने पळविला. त्यानंतरही प्रक्रिया जवळपास थांबली होती. परंतु, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांची कमतरता जाणवत असल्याने डॉक्टरांची उपलब्धता आवश्यक बनली आहे. 

अंदाजपत्रकात १०० कोटींची तरतूद

महापालिकेने अनेकदा जाहिरात काढूनही डॉक्टर सेवेसाठी येत नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे नाशिकसाठीचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासन जिल्हा रुग्णालयाशी करार करणार असल्यामुळे महापालिकेला डॉक्टर मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी बिटकोचे सक्षमीकरण करण्यासाठी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यास सुरू करण्यास प्राथमिकता दिली आहे. गेल्या वर्षी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे पथक मुंबईत या अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲन्ड सर्जनला भेट दिली. त्यानंतर महापालिकेने रुग्णालयाच्या तपासणीसाठी नऊ लाख रुपयांचे शुल्क अदा केले. लवकरच हे पथक तपासणीसाठी बिटको रुग्णालयात येणार आहे. अभ्यासक्रमाला मान्यता मिळाल्यानंतर जूनपासून अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. प्रशासकीय मान्यतेसह अन्य सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आराखडा शुक्रवारी (ता. २९) वैद्यकीय विभागामार्फत सादर केला जाणार आहे. त्यासाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात १०० कोटींची तरतूद केली जाणार आहे. 

५६ डॉक्टर होणार उपलब्ध 

पी. जी. अभ्यासक्रमाला मंजुरी मिळाल्यास स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, सर्जिकल, ऑर्थो, कान, नाक, घसातज्ज्ञ, रेडिओलॉजी, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ या विषयांचे जवळपास ५६ डॉक्टर या रुग्णालयात उपलब्ध होतील. अभ्यासक्रमासाठी रुग्णालयात १२ विभाग तयार केले जातील. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला महापालिका मासिक २० हजारांचे मानधन देणार आहे. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी शंभर कोटींची तरतूद अंदाजपत्रकात केली जाणार आहे. - डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल