बिबटे लोकवस्तीत, तर लोकवस्त्या जंगलात! वाढतोय संघर्ष

घोटी (जि.नाशिक) : कसारा घाटमाथ्यापासून तर त्र्यंबकेश्वर, सिन्नर, नाशिक, अकोले तालुक्यांतील डोंगराळ भागास लागून भरगच्च वृक्ष व विविध जलाशयांमुळे नटलेल्या भागात बिबटे स्थिरावले आहेत. इगतपुरी तालुक्यातील विविध घटनांत आतापर्यंत ३५ बिबटे व त्यांचे बछडे मिळून साठच्या आसपास बिबटे सापडले आहेत. बऱ्यापैकी भक्ष्य मिळत असल्याने या परिसरात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

टेकड्या फोडून जंगलात लोकवस्ती
बिबट्यांची संख्या वाढत असून, बिबटे जसे मानवी वस्तीत घुसत आहेत, तसे जंगलात डोंगरदऱ्या, टेकड्या फोडून जंगलात लोकवस्ती वाढत आहे. लोकांची जंगल जमिनीवर घुसखोरी वाढू लागली आणि जंगली श्‍वापद मानवी वस्त्यात घुसू लागल्याने माणूस बिबट्यतील संघर्ष वाढत आहे. 

घुसखोरी दोन्ही बाजूने 
तालुक्यातील पूर्व पट्ट्यात ऊसलागवड वाढत आहे. उसात लपण्यासाठी सुरक्षित व पुरेशी जाग उपलब्ध होत असल्याने जलाशय धरणाजवळील ऊसशेती बिबट्यांसाठी चांगले आश्रयस्थान झाली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात १५-२० वर्षांत झपाट्याने शहरीकरण सुरू आहे. अनेक डोंगर माथ्यांचे सपाटीकरण होऊन लोकवस्‍त्या वसल्या आहेत. जंगलात वन भागात रिसोर्ट आणि पर्यटनस्थळांच्या नावाने सिमेंटचे जंगल वाढत आहे. लोकपर्यटनाच्या निमित्ताने अधिकाधिक जंगलात घुसत असताना, दुसरीकडे जंगलातील खाद्य संपत चालल्याने जंगली श्‍वापद जंगल सोडून लोकवस्तीत भक्ष्य शोधू लागल्याने माणूस आणि जंगली श्‍वापद यांच्यातील सीमारेषा पुसट होत चालली आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

स्फोटकांचा वापर 
ऊसतोडणीचा हंगाम सुरू असताना समृद्धी महामार्गाचे सुरू असलेले रात्रंदिवस कामकाज व त्यातील डोंगर फोडण्यासाठी वापरण्यात येणारी स्फोटके यामुळे बिबटे, जंगली श्‍वापद त्यांची आश्रयस्थान सोडून शांत ठिकाणाच्या शोधात जंगलालगतच्या अदिवासी वस्त्यांवर हल्ले चढवू लागले आहेत. जंगल व वन्यजीवांच्या रक्षणासाठी स्वतंत्र वन विभाग असला, तरी त्यांना बिबटे पकडण्याचे पिंजरे लावण्याशिवाय इतर कुठल्या कामात अस्तित्व दिसत नाही. त्यामुळे बिबट्या दिसला पिंजरे लावा. पकडलेले बिबटे सोडून द्या. या शिवाय वन विभागात काही घडतही नाही. असा सगळा मामला आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

मानवी जीवन अमूल्य

बिबट्यांची परिसरात झालेली वाढ व उत्पत्ती चांगली आहे. तसे मानवी जीवन अमूल्य आहे. या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी सावध राहणे, रात्रअपरात्री घराबाहेर पडताना, प्रवास करताना काळजी घ्यावी. बिबट्याची चाहूल लागताच घराजवळ प्रकाशाची व्यवस्था करावी, गोठ्यांना दरवाजे लावावेत. बाहेर ओट्यावर झोपू नये. फटाके फोडून घराजवळ लाकडे जळती ठेवावी. - रमेश ढोमसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, इगतपुरी (प्रादेशिक)