बिबट्याच्या धाकाने शेतकरी तीन तास विहिरीत; घटनेने परिसरात भीतीचे वातावरण

निफाड (जि.नाशिक) : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पंधरा शेळ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने पाठलाग केल्यानंतर शेतकरी मात्र बालबाल बचावला आहे. काय घडले नेमके?

पहाटे प्रकार बघितल्यानंतर वन विभागाला माहिती

थेटाळे येथील शेतमजुरी व शेळीपालन करून उदरनिर्वाह करणारे राजाराम शेवरे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या बुधवारी (ता.२४) रात्री शिंदे वस्तीलगत बांधून ठेवल्या होत्या. ते रात्रीच्या वेळी वीज असल्याने शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात सुमारे पंधरा शेळ्या ठार झाल्या. स्थानिक वस्तीवरील शाहू शिंदे व इतरांनी पहाटे ही प्रकार बघितल्यानंतर वन विभागाला माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकारी वर्गाला माहिती दिली. दरम्या‌न, राजाराम शेवरे या शेतमजुरास शेळ्यांची भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

बिबट्याच्या धाकाने शेतकरी तीन तास विहिरीत... 
सोनवडी खुर्द येथे दोन दिवसांपूर्वी गव्हाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या रघुनाथ सानप या शेतकऱ्याचा बिबट्याने पाठलाग केला. बिबट्यापासून बचावासाठी सानप यांनी विहिरीत उडी मारून आपले प्राण वाचवले. त्यामुळे सोनेवाडी खुर्द शिवारात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीकामांवर त्याचा परिणाम झाला आहे. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

महिनाभारापासून बिबट्याची दहशत... 
थेटाळे, उगाव, पानेवाडी, शिवडी, सोनेवाडी भागात महिनाभरापासून शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. वेळोवेळी याबाबत वन विभागाला कळवूनही अद्याप ठोस उपाययोजना न केल्या‌ने नागरिक संतप्त आहेत. 

शेळीपालनाद्वारे आपली गुजराण करणाऱ्या राजाराम शेवरे यांच्या शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवत पंधरा शेळ्या ठार करून मोठे नुकसान केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या घटनेची दखल घेऊन शेवरे यांना मदत करायला हवी. परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असल्याने वन विभागाने सुरक्षेसाठी प्रयत्न करायला हवेत. 
- डी. के. जगताप, जि. प. सदस्य