बिबट्या अन् दोन बछड्यांचे एकलहरे शिवारात दर्शन; परिसरात दहशत

एकलहरे (नाशिक) : एकलहरे शिवारातील परशराम किरकाडे यांच्या शेत गट क्रमांक २५६ मध्ये ऊसतोड सुरू असताना मादी बिबट्या व दोन बछड्यांचे वास्तव्य आढळल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. 

किरकाडे मळ्यात मंगळवारी (ता. १५) ऊसतोड सुरू असताना मुकादम देवा वाघ यांना बिबट्याची मादी व दोन बछडे आढळले. शेतमालक किरकाडे यांनी त्वरित वन विभागाला माहिती दिल्याने वनपरिमंडळ अधिकारी अनिल आहिरराव, वनरक्षक भाऊसाहेब पंढरे, वाहनचालक शरद अस्वले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शोधमोहीम राबविली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, सकाळी सहाच्या सुमारास कामगारांनी ऊसतोड सुरू केली. त्याच वेळी उसातून गुरगुरण्याचा आवाज आल्याने कामगारांचा मुकादम देवा वाघ यांना बिबट्याची मादी व दोन बछडे दिसले. कामगारांच्या आवाजामुळे मादी एका बछड्याला घेऊन उसात नाहीशी झाली, तर दुसरा बछडा उसाच्या बाहेर येऊन घुटमळत राहिला. वन विभागाचे अधिकारी आल्यानंतर वनरक्षक भाऊसाहेब पंढरे यांनी लिंबाचा पाला मागवून त्या पिलाला उसात जेथे मादीचा वावर होता तेथे सोडले. मादी उसातच कुठे असेल तर पिलाच्या वासाने अगर आवाजाने तेथून नेऊ शकेल.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

 उसाच्या मळ्यात कॅमेरा 

आजूबाजूला उसाचे भरपूर क्षेत्र असल्याने सायंकाळी फटाक्यांचा आवाज करणे, उसात दगड-माती फेकणे, लहान मुलांना व पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे आदी सूचना वनपरिमंडळ अधिकारी आहिरराव व वनरक्षक पंढरे यांनी दिल्या. वन विभाग नाशिक रेंजचा लवाजमा व वन्यजीवप्राणी इको संस्थेचे सागर पाटील व सागर सोनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी निगराणीसाठी ३६० अंशांत फिरणारा कॅमेरा लावण्यात आला. त्यामुळे बिबट्याच्या मादीच्या हालचाली समजू शकतील. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ