बियाणे बाजारात जागतिक स्तरावर भारत द्वितीय स्थानी; दीर्घकालीन धोरण गरजेचे

लासलगाव (नाशिक): राकेश बोरा

जागतिक भाजीपाला बियाणे बाजारात भारतीय कंपन्यांचा दबदबा वाढत आहे. भारतही फळे आणि भाजीपाला बियाणे निर्यातीत आघाडी घेत आहे. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये एक हजार चार कोटींचा व्यवसाय देशाने केला आहे. चीननंतर भाजीपाला उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.

  • चीननंतर भाजीपाला उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
  • कृषी माल निर्यातीसाठी दीर्घकालीन धोरण असणे आवश्यक असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
  • फळे आणि भाजीपाला बियाणे निर्यातीतून आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये एक हजार चार कोटींचे परकीय चलन मिळाले.

दीर्घकालीन धोरण गरजेचे

भाजीपाला बियाण्याची देशातील मोठी बाजारपेठ आणि जगभरातून वाढती मागणी यामुळे देशात भाजीपाला बियाणे उद्योग चांगलाच बहरत आहे. असे असले तरी भाजीपाला बियाण्याची उत्पादकता, गुणवत्ता, रोगप्रतिकारकता आणि या बाबींवर संशोधनात भर द्यावी लागेल. शिवाय आपले भाजीपाला बियाणे जगभर पोहोचेल, यावरदेखील अधिक काम व्हायला पाहिजे. यासाठी कृषी माल निर्यातीसाठी दीर्घकालीन धोरण असणे आवश्यक असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

भाजीपाला बियाणे उत्पादनात सरकारी संस्थांपेक्षा खासगी कंपन्यांचा वाटा अधिक आहे. भारतात ५०० हून अधिक लहान-मोठ्या खासगी कंपन्या भाजीपाला बियाणे उत्पादनात असून, त्यातील काही कंपन्या तर फक्त भाजीपाला बीजोत्पादन करतात.

भारतातील फळे आणि भाजीपाला बियाण्यांकडे उच्च वाढीचा उद्योग म्हणून पाहिले जात आहे. नाविन्यपूर्ण उत्पादन पद्धतींच्या आगमनासह कृषी पद्धतींचे आधुनिकीकरण आणि पारंपरिक शेतीला चालना देण्यासाठी सरकारांनी केलेले प्रयत्न फळे आणि भाजीपाला बियाणांची बाजारपेठ वाढविण्यास सज्ज आहेत. याचे फलित म्हणून देशातून झालेल्या फळे आणि भाजीपाला बियाणे निर्यातीतून आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये एक हजार चार कोटींचे परकीय चलन मिळाले असल्याची माहिती कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) (Agricultural & Processed Food Products Export Development Authority (APEDA)) च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

या बियाणांची निर्यात :

बीट, कोबी, फुलकोबी, कांदा बियाणे, वाटाणा, डाळिंब, मुळा, चिंच यासह फळ बियाणांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.

लागवड क्षेत्र असे..

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि ओडिशा ही लागवडीची प्रमुख क्षेत्रे म्हणून उदयास आली आहेत.

प्रमुख निर्यात स्थळे (२०२३-२४) :

यूएसए, नेदरलँड, बांगलादेश, संयुक्त अरब एमटीएस, थायलंड आणि केनिया, पोलंड, इटली, मलेशिया भारतीय बियाणे आयात करणारे प्रमुख देश होते.

गत पाच वर्षांतील निर्यात आकडेवारी

सन २०१९-२०: ७२३ कोटी
सन २०२०-२१ : ८०८ कोटी
सन २०२१-२२ : ७५० कोटी
सन २०२२-२३ : ८२७ कोटी
सन २०२३-२४ : १००४ कोटी
(स्त्रोत : अपेडा) (Agricultural & Processed Food Products Export Development Authority (APEDA))

हेही वाचा: