बिर्‍हाड आंदोलन : पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानाऐवजी आंदोलनकर्ते वळले एकात्मता ट्रॅकवर

malegaon www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
चक्रवाढ व्याजाने कर्जवसुली आणि त्यासाठी थेट शेतजमिन, मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई अवलंबलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धोरणाविरोधात शेतकरी संघटनेने निर्धार केलेल्या बिर्‍हाड आंदोलनासाठी हजारो शेतकरी मालेगावच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी हे वणीतूनही रवाना झालेले असतानाच पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकर्‍यांना दिलासा देणारे वृत्त प्रसारित केले. शेतकर्‍यांची प्रमुख मागणी मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती त्यांनी केली. दरम्यान, मनमाड चौफुली, टेहरे चौफुली व महात्मा गांधी पुतळ्यापासून पालकमंत्र्यांच्या घराकडे जाणार्‍या शेतकर्‍यांच्या मोर्चाला प्रशासनाने एकात्मता जॉगिंग ट्रॅककडे वळविले. त्याठिकाणी शेतकरी नेते दाखल झाले असून,सोमवार, दि.16 दुपारी दोन वाजेपासून या मोर्चाचे सभेत रुपांतर झालेले पहावयास मिळत आहे. तेथूनच पुढील दिशा स्पष्ट केली जाणार आहे.

नाशिक जिल्हा बँकेने 62 हजार थकबाकीदार शेतकर्‍यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरु केली आहे. कर्ज आणि नियमित दरापेक्षा अनेक पटींनी व्याजाची आकारणी होत असल्याने शेतकर्‍यांना सावकारी पाशाचा अनुभव आला. त्यातून गावागावांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बँकेचे आजी-माजी संचालक आणि त्यांच्या नातलगांचे कोट्यवधींचे कर्ज थकीत असताना, मोठ्या थकबाकीदारांना सोडून लहान शेतकर्‍यांना कोंडीत पकडले जात असल्याबद्दल तीव्र असंतोष निर्माण झालेला पहायला मिळत आहे. त्यातून शेतकरी संघटनेने पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगावातील निवासस्थानाबाहेर सोमवारी (दि.16) बिर्‍हाड आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे वेगवेगळ्या तालुक्यात बैठका झाल्यात. दरम्यान, आंदोलनाच्या एक दिवस आधी (दि.15) पालकमंत्री भुसे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेऊन एकूणच मागण्या जाणून घेतल्या होत्या. त्यानुसार शासन व प्रशासकीय पातळीवर हालचाली गतीमान झाल्या. मात्र ठोस निर्णय जाहीर न झाल्याने संघटनेने नियोजनाप्रमाणे बिर्‍हाड आंदोलनाची वाट धरली. शेट्टी हे वणीतून मार्गस्थ झाले. तत्पूर्वी, मालेगावातील आंदोलकांनी महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चा काढला. मोठ्या संख्येने शेतकरी मालेगावात दाखल होत असल्याने पोलिसांनी पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानाकडील सर्व रस्ते बॅरिकेट्सने रोखले आहेत. तर दुसरीकडे आंदोलक शेतकर्‍यांना पोलिस कवायत मैदानाकडे वळविण्यात आले. याठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर होऊन नेत्यांची भाषणे सुरु आहेत.

malegaon www.pudhari.news
मालेगाव : पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानाकडे जाणारे रस्ते असे बंद करण्यात आले आहेत.

मागण्या मान्य, आंदोलन मागे घ्या …. पालकमंत्र्यांचे शेतकरी संघटनेला आवाहन
नाशिक जिल्हा सहकारी बँकेचा परवाना कोणत्याही क्षणी रद्द होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने बॅंकेने सक्ती कर्जवसुली सुरू केली होती. त्यामुळे हजारो शेतकरी अडचणीत आल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान शेतकरी संघटनेने आंदोलनात्मक भूमिका घेतली. या विषयासंदर्भात कालच नेते राजू शेट्टी यांच्याशी दीड तास चर्चा केली. त्यातील मागण्यांबाबत सहकार मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा करित नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्राप्त परिस्थिती कानावर घातली. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज लक्षात आणून दिली. त्यांनी ही वरिष्ठांशी चर्चा विचारविनिमय करून सहा ते टक्के व्याजाने कर्ज वसुलीसह सक्तीची वसुली सौम्य करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होऊन निश्चितच थकबाकीदारांना दिलासा मिळाला आहे, तेव्हा शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन जिल्हाचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post बिर्‍हाड आंदोलन : पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानाऐवजी आंदोलनकर्ते वळले एकात्मता ट्रॅकवर appeared first on पुढारी.