बिलवाडी परिसर हादरला! पहाटेच्या वेळी भूकंपाचे धक्के; भयभीत आदिवासी बांधवांनी रात्र काढली जागून

कळवण (नाशिक) : भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवट परिसरातील बिलवाडी, देवळीवणी, चिंचपाडा, बोरदैवत, जामलेवणी आदी भागात शनिवारी (ता. २८) रात्री चार व रविवारी (ता. २९) सकाळी तीन लहान व मोठे भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभीत झाले आहेत. विशेष म्हणजे, रविवारी सकाळी १०.४५ ला आमदार नितीन पवार हे बिलवाडी येथे आदिवासी बांधवांना भेटण्यासाठी व भूकंपाची माहिती घेण्यासाठी आले असता, त्यांनी सौम्य भूकंपाच्या धक्क्याचा अनुभव घेतला.

भयभीत आदिवासी बांधवांनी रात्र काढली जागून

शनिवारी रात्री तहसीलदार बी. ए. कापसे व अभोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन दिलासा दिला. या धक्क्यांमुळे या भागातील आदिवासी बांधवांनी शनिवारची रात्र घराबाहेर जागून काढली. भूकंपाचे धक्के जाणवू लागताच पंचायत समितीचे माजी सभापती जगन साबळे, बिलवाडीचे सरपंच लक्ष्मण गायकवाड, जामलेवणीचे मनोहर ठाकरे, देवळीवणीचे माजी सरपंच कृष्णा चव्हाण यांनी आमदार नितीन पवार यांना माहिती दिली. रविवारी सकाळी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषद सदस्य, बाजार समितीचे संचालक यांनी भूकंपप्रवण क्षेत्रातील भूकंपाचे धक्के बसलेल्या गावांना भेटी देऊन अधिक माहिती जाणून घेत भयभीत झालेल्या आदिवासी बांधवांना दिलासा दिला. शनिवारी रात्री ८:२४, ८:३५, ९:१२, १० वाजता, तर रविवारी सकाळी ७:४७, १०:१०, १०:३०, १०:४५ परिसरात भूकंपाचे धक्के बसले.

बिलवाडी, देवळीवणी, चिंचपाडा, बोरदैवत, जामले वणी, देवळीकराड, खिराड आदी भागात दोन दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. परंतु धक्का किती बसला, हे काही समजत नाही. भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंप मापन यंत्र शासनाने बसवावे. त्यामुळे भूकंप धक्का किती रिश्टरचा होता व त्याची तीव्रता लक्षात येईल. तरी यंत्रणा कार्यान्वित करावी. - नितीन पवार, आमदार