बूट, पायमोज्यांसाठी अनुदान प्राप्त होऊनही विद्यार्थी वंचितच

शाळेचा गणवेश www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना एकजोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे यासाठी १७० रुपये प्राप्त होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील दोन लाख ६६ हजार ९९९ विद्यार्थ्यांसाठी चार कोटी ५५ लाख ५९ हजार रुपयांचा निधी वर्ग झाला असला, तरी आठ दिवस उलटूनही विद्यार्थी या पूर्ण गणवेशापासून वंचित आहेत.

२०२४- २५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते आठवीमधील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेंतर्गत एकजोडी बूट व दोन जोडी पायमोजे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पात्र सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना हे साहित्य पुरविण्याकरीता १७० रुपयांप्रमाणे दोन लाख ६७ हजार ९९९ पात्र विद्यार्थ्यांकरिता चार कोटी ५५ लाख ५९ हजार ८३० रुपयांचे अनुदान जिल्हा कार्यालयास पीएफएमएस प्रणालीवर प्राप्त झाले आहे. हे अनुदान समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील १५ गटांकडून प्राप्त प्रत्यक्ष मागणीनुसार वर्ग करण्यात आले आहे. दरम्यान, गणवेश बूट / पायमोजे योजनेची मंजूर तरतूद इतर कोणत्याही बाबीवर खर्च करण्यात येऊ नये. मंजूर तरतूद शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खर्च करण्यात यावी. बूट / पायमोजे पुरवठ्याबाबत संपूर्ण अधिकारी हे संबंधित शाळेच्या व्यवस्थापन समितीस असल्याने, शाळा व्यवस्थापन समितीऐवजी कोणत्याही वरिष्ठ पातळीवर (केंद्र, बीट, तालुका) स्तरावरून पुरवठ्याबाबतचे कोणतेही निर्णय घेण्यात येऊ नये, अशा सूचना शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी दिल्या आहेत.

प्रवेशोत्सवही जुन्याच गणवेशावर

शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करत विद्यार्थ्यांचे जुन्याच गणवेशात वाजत- गाजत स्वागत करण्यात आले. शाळा सुरू होऊन आठ दिवस झाले असले, तरी नवीन गणवेशाबाबत अद्यापही कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. गणवेश मिळालेला नसताना मोफत बूट व पायमोजे यांचे अनुदान मात्र, शासनाकडून प्राप्त झाले आहे.

तालुकानिहाय विद्यार्थी व अनुदान (विद्यार्थी संख्या) अशी…

तालुका विद्यार्थी अनुदान
बागलाण 19,531 33,20,270
चांदवड 14,891 25,31,470
देवळा 8,458 14,37,860
दिंडोरी 25,011 42,51,870
इगतपुरी 21,273 36,16,410
कळवण 13,342 22,68,140
मालेगाव 28,486 48,42,620
नांदगाव 18,647 31,69,990
नाशिक 13,491 22,93,470
निफाड 23,617 40,14,890
पेठ 13,250 40,14,890
सिन्नर 18,691 22,52,500
सुरगाणा 16,322 31,77,470
त्र्यंबकेश्वर 15,989 27,74,740
येवला 17,000 27,18,130

हेही वाचा: