नाशिक : मागील आठवड्यात चौथा शनिवार, नियमित साप्ताहिक सुटीचा रविवार व धूलिवंदनाच्या सुटीच्या सोमवार (ता. २९)नंतर मंगळवारी (ता. ३०) आर्थिक हिशेब पूर्ण करण्यासाठी एकच दिवस शिल्लक आहे. यामुळे शहरातील खासगी, सरकारी व सहकारी बॅंकांमध्ये मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे बॅंक प्रशासनासह महापालिकेच्या वैद्यकीय विभागासमोर गर्दी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गर्दीच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा बॉम्ब फुटल्यास शहराला परवडणारा नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आर्थिक वर्षाचा शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ मार्चला बॅंकांचे व्यवहार पूर्णपणे बंद राहतात. गेल्या आठवड्यात शनिवार ते सोमवार अशी तीन दिवस सुटी आहे. त्यामुळे ३० मार्च या एकमेव दिवशी बॅंकांचे व्यवहार सुरू राहणार आहेत. ३१ मार्चनंतर १ एप्रिलला बॅंकांचा क्लोजिंग डे असतो. त्यानंतर पुन्हा तीन दिवस सुटी राहणार असल्याने ३० मार्च या एकाच दिवशी बॅंकांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी शिल्लक असल्याने या दिवशी बॅंकांमध्ये गर्दी उसळणार आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता, बॅंकेसह पालिकेच्या वैद्यकीय विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण
कोरोना संसर्गाचा बॉम्ब फुटल्यास?
साडेसहा तासांच्या बॅंक वेळेत जीएसटी भरणा, चलन, मुद्रांक शुल्क भरणा, करभरणा आदी व्यवहार पूर्ण होतील. मार्चनंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार असल्याने मार्च महिन्यात व्यवहार पूर्ण करण्यासाठी बॅंकांमध्ये गर्दी होणार आहे. सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर न झाल्यास बॅंकांच्या रांगा कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा > कोरोनात मधुमेहींसाठी 'म्युकोरमायकोसिस' रोग ठरतोय 'यमराज'!...
आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने बॅंकांमध्ये मोठी गर्दी होणार आहे. बॅंकांनी होणाऱ्या गर्दीचे योग्य प्रकारे नियोजन करावे, बेजबाबदारपणा दिसून आल्यास बॅंकांवर कारवाई करणार आहे.
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका