बेपत्ता वडिलांचा तब्बल चार दिवसांनंतर शोध; पाण्यात सुमारे तीन किलोमीटरपर्यंत शोधमोहीम

वणी (जि.नाशिक) : केशव वाघमारे २८ मार्चला दुपारी तीनच्या सुमारास घरातून कोणास काही न सांगता निघून गेले. याबाबत त्यांचा मुलगा सचिन वाघमारे याने वणी पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. अखेर बेपत्ता वडिलांचा तब्बल चार दिवसांनंतर शोध लागला.

 

बेपत्ता वडिलांचा तब्बल चार दिवसांनंतर शोध

कुकडमुंडा (ता. सुरगाणा, ह.मु. जोपूळ शिवार, ता. दिंडोरी) येथील केशव वाघमारे (वय ५०) २८ मार्चला दुपारी तीनच्या सुमारास घरातून कोणास काही न सांगता निघून गेले. याबाबत त्यांचा मुलगा सचिन वाघमारे (२२) याने वणी पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता एक व्यक्ती पालखेड डावा कालवा जोपूळ शिवारात अंघोळ करत होती, असे समजले. त्यावरून पालखेड डाव्या कालव्यात शोधमोहीम सुरू झाली. आजूबाजूचे, तसेच चांदोरी, पिंपळगाव येथील पोहणाऱ्या लोकांना बोलावून कालव्यात शोध घेतला. तपास न लागल्याने पोलिस व महसूल विभागाने धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला घटनास्थळी पाचारण केले.

धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाची कामगिरी 

गुरुवारी (ता. १) सकाळी सातला राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी सोनटक्के, भोसले, पवार व त्यांच्या पथकाने पालखेड डाव्या कालव्याच्या पाण्यात तीन ते चार किलोमीटरपर्यंत शोध घेतला. सकाळी साडेअकराच्या सुमारास जोपूळ शिवारामध्ये पालखेड कालव्याच्या पाण्यात केशव वाघमारे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी वणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दिंडोरी तालुक्यातील जोपूळ शिवारातील पालखेड डाव्या कालव्यात चार दिवसांपूर्वी पाण्यात पडलेल्या व्यक्तीचा धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने सुमारे तीन किलोमीटरपर्यंत शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला.