बेभरवशाच्या बागायतीमुळे शेतकऱ्यांचा कडधान्य पिकांकडे कल 

बेभरवशाच्या बागायतीमुळे कडधान्य पिकांकडे कल 

घोटी (जि. नाशिक) : बेभरवशाच्या बागायती पिकांमुळे कडधान्य पिकांकडे ओढा वाढला आहे. शेतकऱ्यांचे नेहमीच बागायती पिकांमुळे होणारे नुकसान आणि त्यातून जगण्यासाठी मार्ग काढताना राबराब राबूनही हाती काही पडत नसल्याने शेतकरी हैराण आहे.

बागायती हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. सहा वर्षांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने होत्याचे नव्हते झाले, तर दुसरीकडे बागायती पिके हाती येताच व्यापाऱ्यांकडून संगनमत करून दर पाडले जातात. त्यात वीजपुरवठा खंडित केला जाऊन वीजजोडणी तोडली जात आहे. 

बागायती पिकांना तालुक्यात कोणत्याही प्रकारचे कोल्ड स्टोरेज नसल्याने पिके शेतात दर असो वा नसो ठेवता येत नाहीत. त्यात लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष शेतकऱ्यांना जखमा देणारा अनुभव कित्येक वर्षांपासून गाठीशी आहेच. भंपक केलेली आंदोलने, शेतकरी नेते अशी शेखी म्हणून मिरवणारी स्वयंघोषित नेते यामुळे हैराण शेतकऱ्यांचा कल कडधान्य पिकांकडे वाढल्याचे आशादायक चित्र आहे. कडधान्य पिकांना कोल्ड स्टोरेजची गरज नसते. त्यातून दर मिळेल तेव्हा विकण्याची संधी निर्माण होत असल्याने साहजिकच कडधान्याकडे ओढा वाढला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार चालू हंगामातील परिस्थिती आशादायक आहे. शिवाय कडधान्य पिकांना पाणी कमी लागतेच. शिवाय रासायनिक खतांचा मारा कमी होत असल्याने मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होत नाही. यातून शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होत असल्याचे समोर आले आहे. कृषी विभागाच्या योजना गावोगावच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी डॉ. शीतलकुमार तंवर यांचा खास वैशिष्ट्यपूर्ण प्रचार यास चांगले सहकार्य मिळत आहे. यातून शेतकऱ्यांचा कडधान्याकडे कल वाढत आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा