बोगस शालार्थ आयडी प्रकरण : भरतीप्रक्रियेची चौकशी अंतिम टप्प्यात 

नाशिक रोड : बोगस शालार्थ आयडी व भरती प्रकरणी चौकशी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. यातील शिक्षण संचालकांकडे चौकशी अहवाल पाठविला असल्याचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी ‘सकाळ’ला सांगितले आहे. 

बोगस शालार्थ आयडी, भरतीप्रक्रियेची चौकशी अंतिम टप्प्यात 
वर्षभरापूर्वी बोगस शालार्थ आयडी प्रकरणी चौकशी सुरू झाली होती. त्यानंतर चौकशी कोविडच्या काळात मंदावली होती. मात्र आता बोगस शालार्थ आयडी आणि भरती प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून, शिक्षकांचे पगार थांबलेले आहेत, त्यांची मान्यताही रद्द केली आहे. ज्या संस्थांनी शालार्थ आयडी मिळविले आहे अशा संस्थांवर पाचोरा, चाळीसगाव, भडगाव येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या भरतीप्रक्रियेची चौकशी शिक्षण संचालक करीत असून, शालार्थ आयडीची चौकशी प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर करीत आहेत. बनावट शालार्थ आयडीचा मुद्दा एक वर्षापूर्वी संबंध महाराष्ट्रात गाजला होता. विधानसभेतही याचे पडसाद उमटले होते.

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

उपसंचालक नितीन उपासनी : चुकीच्या कामांची सहसंचालकांकडून तपासणी 

नाशिक विभागात येणाऱ्या धुळे, नाशिक, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांमधील शाळांचे व संस्थांचे दप्तर तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार असून, यासाठी समिती नेमली आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या मान्यता आवक-जावक रजिस्टर नियम धाब्यावर बसवून संवर्ग व सीनिअॅरिटी असलेल्या शिक्षकांना डावलून केलेल्या सर्व चुकीच्या कामांवर शिक्षण उपसंचालक कार्यालय तपासणी करणार असून, त्याचा अहवाल शिक्षण संचालकांकडे देणार आहेत. 

 हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क
धुळे जिल्ह्यात प्रमाण अधिक 
यासंबंधी चौकशीमध्ये पारदर्शकता असणार काय, असा प्रश्न सध्या शिक्षण वर्तुळात व शिक्षकांमध्ये उपस्थित केला जात आहे. शिक्षण विभागाची चौकशी आयएएस कॅडरच्या अधिकाऱ्यांमार्फत व्हायला पाहिजे. त्यामुळे शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्या नफेखोरीला अटकाव बसणार आहे. नाशिक विभागातल्या धुळे जिल्ह्यामध्ये शालार्थ आयडीचे बोगस प्रकार मोठ्या प्रमाणावर आहे, असा कयास खुद्द शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी व्यक्त केला आहे.