बोगस शिक्षक मतदारांवर गुन्हे दाखल करा: संजय राऊत

Sanjay Raut

सिडको (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – बोगस शिक्षक मतदार शोधून त्यांच्यावर तसेच मुख्याध्यापक, संस्थाचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या माजी शिक्षक आमदारांवर जोरदार टीका केली.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड संदिप गुळवे यांच्या प्रचारार्थ आयोजित शिक्षक मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे अध्यक्ष ॲड नितीन ठाकरे होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार ॲड. संदिप गुळवे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, गजानन शेलार, शिक्षक सेनेचे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार राऊत पुढे म्हणाले की, शिक्षक पदवीधर निवडणुकीत मते बाद होण्याचे प्रमाण बोगस शिक्षक मतदार नोंदणीमुळे अधिक आहे. पुर्वी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह इतरांनी शिक्षकांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली होती. परंतू सध्याच्या राजकारणांनी त्यांना वेठबिगारीचे काम देऊन शैक्षणिक क्षेत्र धोक्यात आणले आहे. राज्यात शेतकरी, शिक्षक सुखी असेल तर राज्य सुखी बनेल, असा दावा राऊत यांनी केला. याआधी निवडून आलेल्या आमदारांनी शिक्षकांच्या प्रश्नावर सभागृह बंद पाडून राज्याचे लक्ष वेधून घेतल्याची घटना घडलेली नाही. जुनी पेन्शन योजनेसह वरिष्ठ वेतनश्रेणीसह इतर समस्या प्रलंबित आहेत. याचे कारण म्हणजे शिक्षणाशी संबंध नसलेले राज्यकर्ते राज्याला लाभले आहे. राजकारण झपाटयाने बदलत असून महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. गुळवे पहिल्याच फेरीत विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: