बोरटेंभेजवळ चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच दिवशी फोडली सात दुकाने

इगतपुरी (नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावरील बोरटेंभे फाट्याजवळील सात दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी (ता.२१) पहाटे ५१ हजार रुपये किमतीचा कॅमेरा व रोख १ हजार रुपयांवर डल्ला मारला. या घटनेची फिर्याद दीपक आडोळे, (रा. बोरटेंभा) यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात दिली. 

व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी गेले असता त्यांना आठ दुकानांपैकी सात दुकानांचे शटर वाकलेले दिसून आले. दुकानांतील सर्व सामान अस्ताव्यस्त आढळले. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. वैष्णवी फोटो स्टुडिओसह ७ दुकानांचे शटर अज्ञात चोरट्यांनी तोडून ५१ हजार रुपये किमतीचा कॅमेरा चोरीस गेल्याचे आढळून आले. तर, काही किराणा दुकानात मालाची नासधूस केल्याचे दुकान उघडल्यानंतर कळाले. या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीत अज्ञात चोरटे चोरी करताना कैद झाले आहे. 
याघटनेमुळे शहरातील लहान मोठे व्यापारी व महामार्गालगतची दुकाने असलेले हॉटेल आदि व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. रात्री व पहाटे पोलिस गस्त वाढवावी अशी मागणी व्यापारी व नागरीकांनी केली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयहरी गांगुर्डे, विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले, वैभव वाणी, मारुती बोराडे करीत आहेत. 

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

इगतपुरीत पोलिस ठाण्यात काही दिवसांपासून निरीक्षक पद रिक्त असल्याने शहरासह परिसरात चोऱ्यांचे व गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील वर्षी बोरटेंभे गावात दरोडा पडला होता. या दरोड्यात एका वृध्द महिलेचा खून झाला होता. आजपर्यंत या दरोड्यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. 
- अनिल भोपे, ग्रामपंचायत सदस्य, टिटोली. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण