बोर्डाकडे प्रस्ताव सादर विद्यार्थ्यांना चित्रकलेचे वाढीव गुण मिळणार – उदय सामंत

येवला (जि. नाशिक) : विद्यार्थ्यांचे हित जोपासत दहावी बोर्डात कला विषयाच्या वाढीव गुणांसाठी प्रस्ताव दाखल आहेत, अशा विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावेत, असे आदेश उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले. यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे दाखल आहेत, त्यांना वाढीव गुण मिळणार आहेत. जे विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा पास झालेले आहेत, त्यांची इंटरमिजिएट परीक्षा शालेय शिक्षण विभागाने तातडीने घेण्याचे नियोजन करावे व ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेऊन त्यांनादेखील दहावीचे वाढीव कलागुण मिळण्यासाठी निर्णय घेण्याचे आश्वासनदेखील त्यांनी दिले. 

दहावीच्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाने परिपत्रकाची होळी करत आंदोलन केले. याची दखल घेऊन मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष झूम मीटिंग घेऊन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्या वेळी त्यांनी हे आश्वासन दिले. कलाशिक्षक महासंघाचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंके, प्रदेशाध्यक्ष विनोद इंगोले यांनी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना गुण देण्यात येऊ नयेत, या शासन निर्णयाविरुद्ध तत्काळ विचार व्हावा, याबाबत चर्चा केली. यावर श्री. सामंत यांनी कला संचालक राजीव मिश्रा यांना थेट विचारणा करून विद्यार्थ्यांचे तुम्हाला हित नको आहे का? आपण का सर्व विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे मनात धरून आहात? चुकीची माहिती तंत्रशिक्षण विभागाला का देता, असे खडे बोल सुनावले. प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी आम्ही सहा महिन्यांपासून शंभर वेळा निवेदने दिली, विविध तक्रारी दाखल केल्या तरी परीक्षा घेतली नसून कलाशिक्षक व कला विषय संपविण्याचा डाव यांचा आहे, असे स्पष्ट मत मांडले. त्यावर सामंत यांनी चौकशीचे आश्वासन देत तुमच्या तक्रारी असतील त्या माझ्याकडे पाठवा, या विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या कोणाची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

अध्यक्ष साळुंके यांनी सांगितले, की कला संचालक थेट सर्व विद्यार्थ्यांना गुण देण्यात येऊ नयेत, असे आदेशात म्हणून मोकळे झाले. परंतु जे विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा पास झालेले आहेत, इंटरमिजिएट परीक्षादेखील पास झालेले आहेत, त्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा आपल्याला अधिकार काय, असा सवाल केला. मागील वर्षी एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षांचे प्रश्नपत्रिका मुंबईतून मांडण्यात आल्या होत्या, अशा भयंकर गोष्टीची जाणीव प्रदेश उपाध्यक्ष शिंदे यांनी करून दिली. शासकीय रेखाकला परीक्षेतील पास झालेल्या विद्यार्थ्यांना लग्न होऊन जाते तरी प्रमाणपत्र मिळत नसल्याची वस्तुस्थिती कला संचालनालयातल्या कामकाजासंदर्भात सांगितली. या संदर्भात तातडीने चौकशी लावतो, असे मंत्री सामंत यांनी या वेळी सांगितले.  

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण