ब्राह्मणगावच्या शिक्षकाकडून मोडी लिपीचे संवर्धन; शासकीय दस्ताऐवज वाचनालाही मदत 

ब्राह्मणगाव (जि.नाशिक) : माध्यमिक शाळेचे शिक्षक व प्रगतिशील शेतकरी भूषण अहिरे यांनी शाळा व शेती या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत मोडी लिपी संवर्धनासह पुरातन नाण्यांचा संग्रह करण्याचा अनोखा छंद जोपासला आहे. या छंदामुळे शासनाच्या जुन्या मोडी लिपीतील काही लेख व माहितीसाठी त्यांची मदत होत आहे. 

मोडी लिपीचा छंद

महाराष्ट्रात सुमारे १२ व्या शतकापासून मोडी लिपीची सुरवात झाली. न मोडता न थांबता झरझर लिहिली जाणारी मोडी लिपी १९६० नंतर कालबाह्य झाली. शिवकाळ व पेशवे काळात वापरली जाणारी मोडी लिपी आता वाचणारे व लिहिणारे खूप दुर्मिळ आहेत. ब्राह्मणगाव (ता. बागलाण) येथील भूषण अहिरे यांनी ऐतिहासिक लिपी संवर्धनाचे काम सुरू ठेवले आहे. ते लखमापूर येथे शिक्षक आहेत. ते स्वतः पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन विभागाकडून प्रशिक्षण घेऊन दहा वर्षांपासून लोकांची मदत करत आहेत. तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यातील मोडी दस्तालेख नोंदी वाचण्याचे काम करतात. शालेय शिक्षणापासून त्यांनी मोडी लिपीचा छंद जोपासला आहे. अनेक दुर्मिळ पुरातन नाण्यांचा संग्रह करून पुढील पिढीला माहिती व्हावी, म्हणून वेळोवेळी विविध शाळेत जाऊन प्रबोधन करतात. अनेक शासकीय विभागांत असणारी मोडी दस्ताऐवज तसेच ऐतिहासिक कागदपत्रे वाचनात आल्याने लोकांची मदत होत आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

दहा वर्षांपासून मोडी दस्ताऐवजांचे वाचन करत आहे. शासकीय दफ्तरातील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शंभर वर्षांपूर्वीचे दाखले वाचन करून लोकांची मदत करताना मिळालेले समाधान हेच आपले मानधन आहे. 
- भूषण अहिरे, मोडी लिपीवाचक, ब्राह्मणगाव 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी