ब्रेनडेड रुग्णामुळे मिळाले जीवदान! ग्रीन कॉरिडॉरने कोल्‍हापूरहून यकृत नाशिकला 

नाशिक : कोल्‍हापूर येथे मेंदूमृत (ब्रेनडेड) रुग्णाने केलेल्‍या अवयवदानामुळे नाशिकच्‍या अपोलो हॉस्‍पिटलमध्ये यकृताच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या रुग्णासाठी जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. ग्रीन कॉरिडॉरने कोल्‍हापूरहून यकृत नाशिकला आणल्‍यानंतर रुग्णालयात प्रत्‍यारोपण शस्त्रक्रियेला सुरवात झाली आहे. 

ग्रीन कॉरिडॉरने कोल्‍हापूरहून यकृत नाशिकला 
अपोलो हॉस्‍पिटलचे सीओओ डॉ. प्रसाद मुगळीकर म्‍हणाले, की आमच्‍या रुग्णालयात यकृताची आवश्‍यकता असलेला नोंदणीकृत रुग्ण दाखल होता. त्‍याच्‍यावर रुग्णालयातील डॉक्‍टरांच्‍या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. कोल्‍हापूरला मेंदूमृत झाल्‍यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्‍याने यादीनुसार नाशिकमध्ये दाखल या रुग्णाला यकृत उपलब्‍ध होणार होते. अंतर खूप असल्‍याने वेळेत यकृत पोचवून शस्त्रक्रिया करणे आव्‍हानात्‍मक होते. त्‍यातच अवयवदानाची माहिती मिळताच, तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या दोन टीम कोल्‍हापूरला जाऊन आवश्‍यक वैद्यकीय चाचण्या करून घेतल्‍या. यानंतर ग्रीन कॉरिडॉरने यकृत नाशिकला आणण्याचा निर्णय सोमवारी (ता. २३) रात्री उशिरा घेण्यात आला. त्‍यानुसार मंगळवारी (ता. २४) सकाळी नऊच्‍या सुमारास कोल्‍हापूरहून यकृत असलेली रुग्णवाहिका व डॉक्‍टरांच्‍या पथकाचे वाहन ग्रीन कॉरिडॉरने नाशिकला रवाना झाले.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

अपोलो रुग्णालयातील रुग्णाला जीवदानासाठी शस्त्रक्रिया 

दुपारी अडीचच्‍या सुमारास रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल झाली. यकृत वेळीच रुग्णालयात पोचले असून, संबंधित रुग्णावर प्रत्‍यारोपणाच्या शस्त्रक्रियेला तातडीने सुरवात केली. सुमारे सात ते आठ तासांचा कालावधी या शस्त्रक्रियेसाठी लागणार असल्‍याचे श्री. मुगळीकर यांनी सांगितले. 

या डॉक्‍टरांनी घेतली मेहनत 
कोल्‍हापूर ते नाशिक असे ४९२ किलोमीटर अंतर साडेपाच तासांत ग्रीन कॉरिडॉद्वारे पार पाडले. शस्त्रक्रिया यशस्वितेसाठी डॉक्‍टरांनी अथक परिश्रम घेतले. यात यकृत प्रत्‍यारोपण शल्‍यचिकित्‍सक डॉ. विक्रम राऊत, डॉ. अशोक थोरात, डॉ. केतुल शहा, डॉ. अमृतराज, तसेच शल्‍यचिकित्‍सक डॉ. मिलिंद शहा, डॉ. धवल चोकसी, भूलतज्‍ज्ञ डॉ. अंबरीन सावंत, डॉ. हर्षित चकसोता, डॉ. भूपेश पराते, डॉ. चेतन भंडारे यांनी परिश्रम घेतले. नाशिकसह नवी मुंबईतील अपोलो हॉस्‍पिटलच्‍या तज्‍ज्ञांची यासाठी सहाय्यता लाभली. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ
रुग्णवाहिकेचा आवाज ऐकताच उडाली धावपळ 
ग्रीन कॉरिडॉरने यकृत कोल्‍हापूरहून निघालेले असताना, प्रत्‍यारोपणाच्‍या प्रतीक्षेतील रुग्णाच्या नाशिकमध्ये वैद्यकीय चाचण्यांसह अन्‍य तपासण्या डॉक्‍टरांनी करून घेतल्‍या. गुंतागुंत लक्षात घेता, शस्त्रक्रियेची संपूर्ण तयारी डॉक्‍टरांनी करून ठेवली होती. शुकशुकाट असताना रुग्णवाहिकेचा आवाज येताच, संपूर्ण यंत्रणेची धावपळ सुरू झाली. वेळीच यकृत नाशिकला पोचल्याने तज्‍ज्ञांनी दिलासा व्यक्‍त केला.