ब्रॉयलर कोंबड्या उत्पादकांना गुजरातचा हातभार; मागणी आणि भाव टिकून

नाशिक : बर्ड फ्लू राज्यात धडकला असताना ब्रॉयलर कोंबड्या उत्पादकांना गुजरातमधील ग्राहकांनी हातभार दिला आहे. गुजरातसाठी एरव्हीच्या तुलनेत शंभर टनांनी अधिक म्हणजेच, २५० टन ब्रॉयलर कोंबड्या राज्यभरातून रवाना झाल्यात. त्यामुळे राज्यातील मागणी आणि भाव टिकून राहिलेत. सोमवार (ता.१२) प्रमाणे आजही किलोला ६५ रुपये असा भाव होता. बर्ड फ्लूच्या अनुषंगाने मध्यप्रदेशच्या महामार्गावरील सीमा तीन दिवस बंद राहणार असल्याने सीमा खुली होण्याची उत्पादकांना प्रतीक्षा आहे. 

मकरसंक्रांतीनिमित्ताने गुजरात आणि मध्यप्रदेशात चिकनला तीन दिवस मागणी वाढते. त्यामुळे मध्यप्रदेशची सीमा खुली झाल्यावर आणखी शंभर टनांनी ब्रॉयलर कोंबड्यांचा खप वाढण्याची चिन्हे आहेत. राज्यातून दिवसाला सर्वसाधारणपणे १३ लाख ब्रॉयलर कोंबड्यांची विक्री होते. सध्यस्थितीत दिवसाला १० लाख कोंबड्यांची विक्री होत आहे. मात्र गुजरातमध्ये ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादन कमी असल्याने उत्पादकांना मदत होत आहे. विदर्भातूनही वाढलेली मागणी आज कायम राहिली. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

ग्राहकांमध्ये भीतीचे प्रमाण कमी 

बर्ड फ्लूची लागण २००६ मध्ये झालेली असताना ब्रॉयलर कोंबड्यांचा खप ८० टक्क्यांनी कमी झाला होता. आता मात्र सरकारतर्फे वेळीच चिकन आणि अंडी शिजवून खाण्याचा सल्ला दिला गेल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे प्रमाण कमी राहिल्याचे सध्यस्थितीत घटलेल्या ३० टक्के मागणीवरून दिसून येते. सध्यस्थितीत नाशिक, पुणे अशा शहरांमधील मागणी ३० टक्क्यांनी, तर मुंबईत १५ ते २० टक्क्यांनी मागणी घटली आहे. मांसाहारासाठी रेस्टॉरंटमध्ये भोजन करणे पसंत केले जात असल्याने चिकनचा खप कमी होऊ शकले नसल्याचा निष्कर्ष उत्पादकांचा आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर घटलेला खप संक्रांतीच्यानिमित्ताने पूर्वपदावर येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

 

बर्ड फ्लूच्या चर्चेमुळे ब्रॉयलर कोंबड्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी दक्षता घेतली आहे. गेल्या आठवडाभरात उत्पादनासाठी ५० टक्के पिल्ले शेतकऱ्यांनी टाकलेली नाहीत. त्याचा परिणाम येत्या ३५ दिवसांनी जाणवणार आहे. मात्र तोपर्यंत शिल्लक राहिलेल्या कोंबड्या विकल्या जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोंबड्या विकण्याची घाई करू नये. 
- उद्धव अहिरे, आनंद ॲग्रो समूह