भंडारा घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात बोंबाबोंब! आग प्रतिबंधक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक : भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील आग प्रतिबंधक व्यवस्थेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयातील आग प्रतिरोधक यंत्राची (फायर एस्टीन्गिव्हशर) ३० एप्रिलला मुदत संपूनही कालबाह्य यंत्रावर रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. दिवसभर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर शनिवारी (ता. ९) सायंकाळी मुख्य सचिवांनी राज्यातील रुग्णालयातील दुरवस्थेचा आढावा घेतला. त्यात हा प्रकार समोर आला असून, आता यंत्रणा याबाबत काय दखल घेते, याकडे लक्ष लागून आहे.

मुदतबाह्य यंत्रावर कामकाज 

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आग लागल्यास आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी साधारण १२० आग प्रतिरोधक यंत्र बसविलेली आहेत. मात्र, या सगळ्या यंत्रांची मुदत ३० एप्रिल २०२० ला संपली आहे. दोन वर्षांपूर्वी बालकांच्या उपचार कक्षात प्रिमॅच्युर बालकांच्या संगोपनासाठी काचेच्या ४५ पेट्यांची व्यवस्था केली असली, तरी हा कक्षच नव्हे, तर अतितक्षता विभागासह सगळ्याच विभागातील यंत्रांची मुदत संपून नऊ महिने होऊनही यंत्र बदललेली नाहीत, अशा तक्रारी विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मांडल्या. त्या वेळी लागलीच धावाधाव करीत पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे, बालरुग्ण कक्षात सध्या ४७ बालकांवर उपचार सुरू असून, तेथील अडचणींचा पाढा कर्मचाऱ्यांनी वाचला. 

पालकच करतात धावाधाव 

जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या बालकांवर उपचार करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक असली, तरी बरीच कामे पालकांनाच करावी लागतात. सोनोग्राफीसह तत्सम तपासण्यांसाठी आजारी मुलांच्या मातांना मूल हातात घेऊन जावे लागते. सायंकाळी एका बाजूला मुख्य सचिव राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांकडून बालरुग्ण कक्षांतील कामकाजाचा आढावा घेत होते, तर दुसरीकडे काही माता त्यांच्या बाळांना उपचारासाठी स्वत:च घेऊन जात होत्या. असेही चित्र प्रत्यक्ष भेटीत पाहायला मिळाले. 

अग्नी प्रतिरोध यंत्रणा सक्षमच 

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील सर्व १२० अग्निप्रतिबंधक यंत्रांची मुदत मार्च २०२१ पर्यंत आहे. तसेच, इलेक्ट्रिक साधने, वायरिंग व्यवस्थित असून, रुग्णालय आगीबाबत पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा आरोग्य प्रशासनाने केला आहे. भंडारा येथील दुर्घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रावखंडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत खैरनार आदींच्या पथकाने अग्निप्रतिबंधक यंत्रणेची पाहणी करून, त्यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात दोन वर्षांपूर्वी बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यापासून येथे विशेष काळजी घेतली जात असून, चोवीस तास कर्मचारी कार्यरत असतात. जिल्हा रुग्णालयात राज्यस्तरीय समिती, अग्निशामक दलाने पाहणी केल्याचा अफवा सोशल माध्यमांमध्ये पसरल्या होत्या. या खोट्या असून, अग्निप्रतिबंधक साधनांची नियमित तपासणी केली जाते. तरीही, भंडारा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आपणच ही तपासणी आज केल्याचे डॉ. रावखंडे यांनी सांगितले.

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

खरे काय?

जिल्हा रुग्णालयातील सूत्रानुसार, अग्निप्रतिरोध यंत्राची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत आहे. पण प्रत्यक्ष जिल्हा रुग्णालयाच्या भेटीत मात्र संबंधित यंत्रावर ३० एप्रिल २०२० हीच ‘एक्स्पायरी’ तारीख असल्याचे दिसले. त्यामुळे खरे काय हे गूढ कायम आहे. भंडारा येथील दुर्घटनेच्या वृत्तानंतर येथील यंत्रणा सकाळी खडबडून जागी झाली.

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप