“भंडारा दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवा”

नाशिक : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या बालकांच्या कुटुंबियांना १० लाखाची मदत देण्याची मागणी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली. 

भाजपच्या फरांदे यांच्यासह आमदार मनिषा चौधरी, माधुरी मिसाळ यांच्या शिष्टमंडळाने भंडारा रुग्णालयाला भेट दिली. 

सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करा

निवासी जिल्हाधिकारी शिवराज पडोळे व जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांना दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली. निवेदनात आमदार फरांदे यांनी घटनेची सखोल चौकशी करावी, मृत बालकांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत द्यावी व भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी शंभर कोटी रुपये उपलब्ध करून द्यावी, असे म्हटले आहे. मृत बालकांच्या नातेवाईकांनी शॉर्टसर्किट होत असल्याची माहिती रुग्णालय कर्मचायांना देवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे. अशी मागणी करण्यात आली. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार